कोल्हापूर : शाहू मिल राजर्षी शाहूंचे जिवंत स्मारक व्हावं – खासदार संभाजीराजे

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
रयतेला रोजगार मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेली कोल्हापुरातील शाहू मिल ही वास्तू व परिसर शाहू महाराजांचे जिवंत स्मारक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व निमित्ताने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शाहू मिल येथे छत्रपती शाहू महाराजांच्या दुर्मिळ फोटो प्रदर्शनास भेट दिली. यावेळी स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त काढण्यात आलेल्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले.
यंदाचे वर्ष हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने जिल्ह्यात 18 एप्रिल पासून विविध कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात येत आहे.
खासदार संभाजीराजे म्हणाले, शाहू जन्मस्थळाची उर्वरित कामे प्राधान्याने हाती घेऊन ती पूर्ण करणे गरजेचे आहे. रोजगार निर्मितीसाठी सुरू केलेली शाहू मिलदेखील शाहू महाराजांचे स्मारक होण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. “राज्यसभेत देखील हा प्रश्न मी मांडला होता. त्यामुळे शाहूंची ही स्मारके जीवित करावीत”, अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. प्रदर्शनातील दुर्मिळ छायचित्रे पाहून खासदार संभाजीराजेंनी शाहूंच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी देविकाराणी पाटील आणि अमित अडसूळ यांनी दुर्मिळ छायाचित्रांची तर प्राचार्य अजेय दळवी आणि विजय टिपुगडे यांनी १३० कलाकारांनी काढलेल्या राजर्षी शाहूंच्या चित्रांची माहीती दिली. यावेळी आदित्य बेडेकर, उदय गायकवाड, सुखदेव गिरी, संजय पवार, अमर पाटील, जयदीप मोरे, अभिजित पाटील, उदय घोरपडे आदी उपस्थित होते.