बेळगावात शिवसेना पदाधिकाऱ्याच्या गाडीवर कन्नडिगांचा हल्ला, घटनास्थळी तणाव

कोल्हापूर प्रतिनिधी :
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या गाडीवर व रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बेळगाव शहरातील सम्राट अशोक चौक परिसरात घडली. इतकेच नव्हे शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फसण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बेळगाव शहरातील रामलिंग खिंड येथील शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला. तसेच रुग्णवाहिकेचा बोर्डही तोडण्यात आला. पोलीस संरक्षण असतानाही हा प्रकार घडल्यामुळे सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यावेळी गाडीला काळे फासण्याचा प्रयत्न होत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले आणि पळवून लावले. बेळगावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी सुरू केला आहे. शुक्रवारी दुपारी सम्राट अशोक चौकाजवळ शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोखण्यास गेलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर तसेच शिवसैनिक प्रविण तेजम यांनाही रोखण्याचा प्रयत्न झाला. यावेळी जोरदार वादावादीही झाली. दरम्यान, या प्रकारामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.