स्थानिक व्यावसायिक व उद्योजक यांच्या नवतंत्रज्ञानास आमचे नेहमीच प्रोत्साहन : राजे समरजितसिंह घाटगे ; कोल्हापुरात विकसित केलेल्या ऊस तोडणी यंत्राचे कारखाना प्लॉटवर प्रात्यक्षिक

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शाहू साखर कारखान्यात नव- नवीन तंत्रज्ञान अवलंबण्यास नेहमीच प्राधान्य दिले. त्यामध्ये आम्ही आणखी भर घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोल्हापूर अंतर्गत स्थानिक उद्योजकांनी विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानास प्रोत्साहन देत आहोत. स्थानिक व्यावसायिक व उद्योजक यांच्या नवतंत्रज्ञानास आमचे नेहमीच प्रोत्साहन राहील,असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे शाहू साखर कारखाना साइटवर एस.बी. रिशेलर्स या कोल्हापूर मधील स्थानिक कंपनीने विकसित केलेल्या ऊस तोडणी यंत्राच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी.पाटील, पियुष झाला, नितीश चौरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री घाटगे पुढे म्हणाले, स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी पंधरा वर्षांपूर्वी राज्यात सर्वप्रथम ऊस तोडणी यंत्राचे प्रात्यक्षिक शाहू साखर कारखाना कार्यक्षेत्रात घेतले होते. आता कारखान्याकडे पंधराहून अधिक ऊस तोडणी यंत्रे यशस्वीपणे कार्यरत आहेत. आता या यंत्रांमधील त्रुटी दूर करून ती अद्यावत केली आहेत. जुन्य यंत्रांच्या तुलनेत या यंत्रांची कार्यक्षमता वाढवून मेंटेनन्स खर्च कमी केला आहे.तर कारखान्यांच्यादृष्टीने उसाच्या रिकव्हरीवर परिणाम करणाऱ्या पाचटाचे प्रमाण कमी येत असल्यामुळे कारखाना पर्यायाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.
एस.बी. रेशिलर कंपनीचे सचिन कुटे म्हणाले, सध्या कार्यरत असणाऱ्या ऊस तोडणी यंत्रांच्या तुलनेत या यंत्राची कार्यक्षमता अधिक असून इंधन व देखभाल दुरुस्ती खर्च कमी आहे. कोल्हापूरमध्ये तयार झालेले हे यंत्र कोल्हापूरकरांना फायदेशीर ठरल्याशिवाय राहणार नाही.यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, वाहनधारक व परिसरातील विविध कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.स्वागत कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले. आभार संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांनी मानले.
यांत्रिक ऊस तोडणी शिवाय पर्याय नाही….
ऊस तोडणी मजुरांकडून होणारी फसवणूक व त्यांच्या टंचाईमुळे कारखान्यांना गाळप क्षमते इतका ऊस पुरवठा होण्यामध्ये अडथळे येत आहेत.त्यामुळे आता यांत्रिक ऊस तोडणी शिवाय पर्याय नाही. हा बदल आता शेतकऱ्यांनी व कारखानदारांनी स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही.असे मत यावेळी श्री. घाटगे यांनी व्यक्त केले.