सीएनजीचलित ट्रॅक्टर उपक्रमाबद्दल शाहू साखर कारखान्याचे केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या कडून अभिनंदन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने 45 व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच सीएनजीचलित ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक व शेती मशागतीचे प्रात्यक्षिक घेतले . देशातील हा पहिलाच प्रयोग असावा . याची दखल देशपातळीवर घेण्यात आली असून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी शाहू साखर कारखान्याचे या शेतकरी अभिमुख उपक्रमाबद्दल कौतुक व अभिनंदन केले आहे.शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना या उपक्रमाची ट्विटरवरून माहिती दिली होती. त्याला प्रतिसाद देताना त्यांनी श्री. घाटगे यांचे आज अभिनंदन केले.
केंद्रीयमंत्री गडकरी यांनी मागील आठवड्यामध्ये देशातील सीएनजीचलित पहिला ट्रॅक्टर लॉन्च केला आहे.सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे सातत्याने धोरण राहिले आहे. शेतीच्या उत्पादन खर्चात कपात करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहेत. यापासून प्रेरणा घेऊन त्याचाच एक भाग म्हणून शेतीच्या प्रगतीसाठी अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राजे समरजितसिंह घाटगे करत आहेत.अत्याधुनिक सोईसुविधांमध्ये शेतीमध्ये ड्रोनचा वापर असेल किंवा सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर असेल. या ट्रॅक्टरमुळे वर्षाला डिझेलचा जवळपास १ लाख रु. खर्च वाचू शकतो. त्यांच्या या प्रयत्नांचे केंद्रीय परिवहनमंत्री नितीनजी गडकरी यांनी कौतुक केले.
शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आधुनिकतेकडे नेण्यासाठी राजे समरजितसिंह घाटगे नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत.त्याची देश पातळीवर दखल घेतल्याने शाहूच्या सभासद शेतकरी,कर्मचारी अशा सर्वच घटकांतून समाधान व्यक्त होत आहे.