उद्योजकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील : समरजितसिंह घाटगे; श्री लक्ष्मी टेकडी जवळ उड्डाणपुल मंजुर करून आणलेबद्दल उद्योजकांच्या वतीने सत्कार

कागल प्रतिनिधी :
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील छोटे-मोठे व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. अशी ग्वाही शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागलच्या श्री लक्ष्मी टेकडी जवळ कागल ते सातारा सहापदरीकरण कामावेळी उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळविल्याबद्दल श्री घाटगे यांचा मॅकच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले,पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते सातारा या महामार्गाचे सहापदरीकरणाच्या कामाचा प्रारंभ नुकताच झाला आहे. कागल जवळील श्री लक्ष्मी टेकडी येथे उड्डाणपूल उभा करावा अशी मागणी बऱ्याच दिवसापासून होती. या टेकडीच्या पूर्व बाजूला पंचतारांकित तर उत्तर बाजूला गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत आहे. त्याचप्रमाणे विविध साखर कारखाने व अनेक छोटे-मोठे प्रकल्प या परिसरामध्ये कार्यरत आहेत. शिवाय नेर्ली, विकासवाडी, तळंदगे ,हलसवडे, या गावातील वाहतुकीचा परिणाम मोठ्या वर्दळीच्या रूपात होत आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा लहान मोठे अपघात होऊन कित्येक लोक मृत्युमुखी पडले आहेत. या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास या अपघातांच्या प्रमाणात घट होईल. शिवाय सर्व वाहतुकही सुरळीतपणे चालू राहील. उद्योजकांसह सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या केलेल्या कामाच्या पाठपुराव्यास अत्यंत कमी वेळेत मंजुरी मिळाली.याचे सर्व श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना जाते.लवकरच या कामास सुरवात होईल.
यावेळी मॅकचे माजी अध्यक्ष वाय व्ही पाटील, मोहन कुशिरे, राजे बॅंकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, राजेंद्र जाधव, बसगोंडा पाटील, विशाल पाटील, सुरेश क्षीरसागर , शिवाजी भोसले, हरिश्चंद्र धोत्रे,सुशांत कालेकर, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत मॅकचे संचालक मनोहर शर्मा यांनी केले.आभार उपाध्यक्ष संजय पेंडसे यांनी मानले.
“शाहू”ची रुग्णवाहिका एमआयडीसीसाठी 24 तास उपलब्ध
या कार्यक्रमात मी राजकारण बाजूला ठेवून सहभागी झालो आहे. आरबीआयची मंजुरी मिळताच राजे बॅंकेची शाखा येथे काढण्यासाठी प्रयत्नशील राहू.तसेच राजे फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा या परिसरातील नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करू. उद्योजकांच्या मागणीनुसार शाहू साखर कारखान्याकडील रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध करुन दिली जाईल.अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.