क्रांतिसिंह नाना पाटील नगरात ‘वृक्ष वंदन’ उपक्रमाने दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील प्रफुल्लित केंद्रामार्फत महिला व मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध मोफत शारीरिक, मानसिक व बौद्धिक उपक्रमांतर्गत ‘वृक्ष वंदन’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अनोख्या उपक्रमात झाडांना राखी बांधून त्यांचे पूजन करण्यात आले आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित सर्व महिलांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. याप्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी निसर्गाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. आपण दररोज त्याची काळजी घेतली पाहिजे.”
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांनी भाऊ-बहिणीच्या नात्याचे उदाहरण देत निसर्ग संवर्धनाचे महत्त्व विषद केले. “ज्याप्रमाणे बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करतो, त्याचप्रमाणे आपणही निसर्गाचे रक्षण केले, तर निसर्ग आपले रक्षण करेल,” असे मत त्यांनी मांडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रेश्मा कातकर, श्रावणी पाडळकर, बिस्मिल्ला नदाफ, सना मुल्ला, श्वेता गुरव आदींनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे परिसरात निसर्गप्रेमाचे आणि पर्यावरण संवर्धनाचे वातावरण निर्माण झाले.