टिलूभाऊ : मजरे कासारवाडा गावातील उमलते नेतृत्व हरपले

आनंद वारके
(मजरे कासारवाडा)
मजरे कासारवाडा ता.राधानगरी येथील श्रीराज अशोकराव वारके (वय ३०) यांचे आज आकस्मिक निधन झाले.
वेळ सकाळी नऊची.टिलूचे निधनाची बातमी.मन सुन्न टाकणारी आणि ह्दय पिळवटून घटना घडली गावात.गावच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना.टिल्लूचे निधन झाल्याचे समजताच बधीर झाले
सर्वांचे मेंदू .कुणाला काय सुचेना अशी अवस्था झाली.टिल्लू गेला यावर कोणाचा विश्वासही बसेना.वडील माजी सरपंच अशोकरावांना हे दुःख कसे पेलणार या काळजीत बुडाले गाव.आयुष्यभर ज्यांनी गावाला मदत केली त्यांच्या वाट्याला असा प्रसंग नकोच होता.अशी हळहळ प्रत्येकाच्या मनात.आणि अश्रुधारा डोळ्यात.
एक गोंडस,हसरे,फुलणारे व उमलणारे व्यक्तिमत्त्व टिलू.आज तो कासारवाडा गावातून कायमचा हरवला.प्रत्येकाला तो आपला आधार वाटत होता.पाठीराखा वाटत होता.टिलू गेला.आता गावाने आधाराच्या आशेने कुणाकडे पाहायचे?तो परत येणार असता तर वाटेल तो त्याग करायला अख्खे गाव सेकंदात तयार झाले असते.पण टिलू वेगळ्या ठिकाणी गेला.गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू ठेवून.
बायाबापड्या व त्याच्या मित्र परिवाराच्या डोळ्यांना सकाळपासून अश्रूधारा लागल्या.अख्खा दिवस उलटला तरी या अश्रुधारा थांबायला तयार नाहीत.या अश्रूधारा थांबायला काही दिवस काही वर्षे जावी लागतील.
अशी वेळ या बाळावर यायला नको होती.टिलू भाऊवर.तो केवळ अशोकरावांचा पुत्र नव्हता.तो अख्ख्या गावचा पुत्र होता.आजचा दिवस कासारवाड्याच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस.गावाने इतके दुःख कधी पाहिलेले नव्हते.हे दुःख कसे पचवायचे या विवंचनेत आज अख्खे गाव बुडालेले आहे.
टिलू दिसायचा सतत उद्याेगात.कधी ट्रॅक्टर घेऊन,कधी जेसीबी घेऊन.कधी पोकलॅन घेऊन.मोठ्या घराण्यातील म्हणून टिलूने कधी अभिमान बाळगला नाही.पडतील ती कामे करत होता टिलू.सकाळी लवकर उठून शेतीची व अनेक उद्याेगाची कामे करणे.कामाची जोडणी करणे.आणि स्वत:ला दिवसभराच्या कामाला जुंपून घेणे.वेळ मिळेल तेव्हा मित्रांच्या कामाला मदत करणे.असे टिलूचे दिवसभराचे वेळापत्रक.
मित्रांची मांदियाळी होती टिलूची.निष्ठावान मित्र.जिवाभावाचे.टिलूचा फोन म्हटले की पाच दहा तरी मित्र गोळा होणार.वावगे काही चालत नव्हते टिलूला.जे गावच्या कल्याणासाठी असेल तेवढेच करायचे.
गावातील गोरगरिबांबद्दल टिलूच्या मनात कळवळा.अडलेल्या नडलेल्यांना आपल्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी करणार.मदतीसाठी दिवस रात्र अशी वेळ नाही.चोवीस तास मदत घेऊन टिलू धावत सुटलेला.आपल्या माणसांसाठी.अहोरात्र. मग तेथे ट्रॅक्टर व मोटारसायकलमधील डिझेल,पेट्रोलचा हिशेब नाही.तिथं वेळेचा हिशेब नाही.
कुणाची नांगरट केली,कुणाचे भाडे मारले,कुणी वीट नेली,कुणी जेसीबी भाड्याने नेला.त्यांना भाडे द्या.पैसे द्या.असा शब्द कधी टिलूच्या तोंडातून गेला नाही.आजोबा माजी सरपंच कै. गणपतराव नाना वारके व आजी कै.भागिरथी गणपतराव वारके यांचाकडे होता दानशूरपणा.तो गुण पाझरत आला अशोकराव वारके यांच्यामध्ये.तसाच तो टिलूमध्येही उतरला होता.
‘काया हे काळाचे भातुके’ किंवा मरण कोणाला चुकत नाही.हे खरे अाहे.पण मरणालाही वय असते.टिलू त्याला अपवाद ठरला.उमलत्या व उमेदीच्या वयात काळाने त्याच्यावर झडप घातली.नियती किती क्रूर असते ते अनुभवले आज गावाने.
गावाला नेतृत्व केवळ पुढारी म्हणून नको असते.तर एखाद्या नेतृत्वामुळे गावात एकोपा राहतो.भाऊबंदकीत निर्माण होत नाहीत वाद.गावात तंटे निर्माण होत नाहीत.गावातील असे तंटे सोडविण्याचे सामर्थ्य होते टिलूमध्ये.अलिकडे गावात त्याचा शब्दही प्रमाण मानला जात होता.भविष्यात गावात सामंजस्य ठेवण्यासाठी हवा होता टिलू अख्ख्या गावाला.पण काळाने हरपले गावचे उमदे व उमलते नेतृत्व.
आता अख्ख्या कुटुंबाची सारी मदार होती टिलूवर.कुटुंबाप्रमाणेच अख्खा गावाचीही मदार होती टिलूवर.एक कर्तापुरुष होता टिलू.नुकतीच संसाराला सुरुवात.मोठ्या अपेक्षेने,भावी जीवनाची स्वप्ने रंगवत मोठ्या आनंदाने राहणारी पत्नी,अजून पप्पा म्हणून हाकही न मारलेला कोवळा चिरंजीव श्रेयांश,गाव आणि परिसराला अहोरात्र मदत करण्यासाठी झटणारे वडील,लक्ष्मणासारखा भाऊ.भावड्या हा त्याच्या तोंडातील परवलीचा शब्द.असे कुटुंब.श्रेयांशच्या जन्माने पुढच्या पिढीची सुरुवात.असे आनंदात आणि दुसर्याच्या सुखात आपले सुख मानणारे कुटुंब.आता या कुटुंबात बाळ टिलू तुझी एकट्याचीच उणीव.कायमची.या उणीवेचे दुःख कुटुंबातील सर्वांनी,मित्र परिवाराने व गावाने कसे सहन करायचे?
रस्त्यावर कोणाचा अपघात झाला की सर्वांच्या अगोदर टिलू हजर.स्वत:ची जीप घेऊन.ज्या दवाखान्यात पेशंट पोहचवायचा तिथंपर्यंत.
वडील,आई,पत्नी,एक मुलगा,दोन बहिणी ,एक भाऊ ,चुलते,चुलती व चुलत भाऊ असा परिवार त्यांच्यामागे
आहे.अख्खा परिवाराचा लाडका टिलू.टिलू एका मोठ्या घराण्यातील व माजी सरपंचांचा मुलगा.पण हा बडेजाव टिलूने कधी दाखविला नाही.
आता दिसणार नाही टिलूचे गोंडस हास्य,रस्त्यावरील अपघातग्रस्तांना धावत जाऊन केलेली मदत.
परत या टिलूभाऊ.गावच्या मदतीसाठी.
आम्ही आपली वाट पाहतच राहू.
टिलूच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या परिवाराला,गावातील व गावाबाहेरील त्याच्या मित्र परिवाराला,गावातील आबालवृद्धांना, बायाबापड्यांना व समस्त गावकर्यांना झालेल्या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वराने द्यावे ही इच्छा.