यंदाचा शिवसेना चा दसरा मेळावा कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करूनच “या” ठिकाणी होणार साजरा.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर न होता शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना ऑनलाईन मार्गदर्शन केले होते. आता यंदाचा दसरा मेळावाही ऑनलाईनच होणार की प्रत्यक्ष मेळावा होणार यावर चर्चा सुरू असताना आता शिवसेनेच्या बहूचर्चित दसरा मेळाव्याचं ठिकाण अखेर ठरलं आहे.
यंदाचा दसरा मेळावा मुंबई सायनच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. 50 टक्क्यांच्या उपस्थित हा दसरा मेळावा पार पडणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्याला सगळे वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहाणार असल्याची चर्चा आहे. राज्यासह मुंबईतही कोरोनाचा प्रभाव ओसरत आहे. तरी कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करूनच यंदाचा दसरा मेळावा साजरा होणार आहे.
यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियम आणि संकेतांचं पालन करून दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही अशी इच्छा असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यानुसार आता दसरा मेळावा 50 टक्क्यांच्या उपस्थितीत सायन येथे होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच दसरा मेळावा कोरोनाच्या प्रादुर्भावाने ऑनलाईन पद्धतीने झाला होता. यंदाचा दसरा मेळावाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईनच होणार असल्याची चिन्हं होती. पण मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कसलाही धोका नसल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केलं. त्यानुसार दसरा मेळाव्याच्या हालचालींना वेग आला होता.