यावर्षीचा गणेशोत्सव सीसीटीव्हीच्या निगराणीतच साजरा करण्यात यावा : डीवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर ; मुरगूड पोलीस स्टेशन अंतर्गत ५८ गावातील मंडळांची बैठक

मूरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राज्यात काही ठिकाणी अनुचित घटना घडल्या आहेत त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव सीसीटीव्हीच्या निगराणीतच साजरा करण्यात यावा, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये व पोलिसांना तपासकामात मदत होईल. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा ही प्राथमिकता असून, प्रत्येक गणेश मंडळाने आपापल्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी,सुरक्षित आणि सुसंस्कृत गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे असे आवाहन डीवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर यांनी केले.
मुरगूड (ता. कागल) येथे आगामी गणेशोत्सव पारदर्शक, शांततामय आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी मुरगूड पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील ५८ गावांतील सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. या बैठकीस मोठ्या संख्येने मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी एक गाव एक गणपती उपक्रम राबवणाऱ्या आठ गावांना सन्मानित करण्यात आले. तसेच पाच तरुण मंडळाना गणराया अवार्ड ने गौरविण्यात आले.
यावेळी मुरगूड चे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. त्याने मंडळांनी कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावू नये असे आवाहन केले.आतापर्यंत 50 सार्वजनिक तरुण मंडळावरती गुन्हे नोंद झाल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा रवींद्र शिंदे,चंद्रकांत जाधव ओंकार पोतदार, बाळासाहेब भराडे,नामदेव भराडे, राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आभार पोलीस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे यांनी मांडले तर सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.बैठकीचे नियोजन सहा फौजदार प्रशांत गोंजारे यांनी केले होते.उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तेजस घोरपडे,कृष्णात भुते, रघुनाथ बोडके यांचा यथोचित सन्मान करण्यात आला
एक गाव एक गणपती
चौंडाळ, बेलेवाडी काळामा, भगतसिंग तरुण मंडळ जैन्याळ, भावेश्वरी तरुण मंडळ ठाणेवाडी,शिवाजी तरुण मंडळ बिद्री, न्यू गणेश तरुण मंडळ अलाबाद, राधाकृष्ण अष्टविनायक तरुण मंडळ बाळेक्रे आणि चॅलेंज ग्रुप फराकटेवाडी या मंडळांचा सन्मान करण्यात आला.
गणराया अवार्ड
प्रथम क्रमांक शिवशंभो तरुण मंडळ बोरवडे, द्वितीय क्रमांक श्री गणेश तरुण मंडळ मुरगुड, तृतीय क्रमांक यंग स्टार तरुण मंडळ सावर्डे बुद्रुक, चतुर्थ क्रमांक भावेश्वरी व्यायाम मंडळ माद्याळ, पाचवा क्रमांक देश प्रेमी स्पोर्ट्स कुरणी