आज पहाटे लक्षतीर्थ वसाहत, पंचगंगा नदी घाटावर गवा रेड्याचे दर्शन; स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लक्षतीर्थ वसाहतीत आणि आज पहाटे पंचगंगा नदी घाटावर गवा रेड्याने दर्शन दिल्याने स्थानिक लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा गवा रेडा महे, पाडळी खुर्द, बालिंगा या परिसरात दिसून आला होता.
गुरुवारी रात्री लक्षतीर्थ तळ्यालगत असणाऱ्या महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शाळेजवळ गवा रेडा आला. यानंतर त्या गव्याला कुत्र्यांनी घेरून जोरजोरात भुंकायला सुरु केली. स्थानिक नागरिकांनी हे पाहिल्यानंतर गव्याला हुसकावण्यात आले. दरम्यान, आज सकाळी याच गवा रेड्याने जामदार क्लब जवळ गायरान परिसरात ठाण मांडल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या गव्याला नैसर्गिक आदिवासात परत पाठवण्यासाठी वनविभाग, पोलिस प्रशासन आणि प्राणी मित्र संघटना कामाला लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा गवा रेडा नागरी वस्तीत शिरु नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच नागरिकांची गर्दी होऊन गवा रेड्याच्या जीवितास धोका पोहचू नये यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
गंगावेशकडून येणारे रस्ते पोलिस प्रशासनाने बंद केले आहेत. तसेच शिवाजी पुलावरुन येणारी वाहतूक गायकवाड वाड्याजवळ बदं केली आहे. बघ्यांची गर्दी झाली असून वनविभाग पोलिस प्रशासन या ठिकाणी तळ ठोकून आहे. गव्या रेड्याला नैसर्गिक अधिकवासात सोडण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येते. गवा रेड्याच्या दर्शनाने मात्र लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.