अंबाबाईला लस दिली म्हणून ते पैसे उचलतील ; राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या आक्रमक महिला कार्यकर्त्यांचा आरोप ; भ्रष्टाचाराच्या किस्स्यानी मंत्री श्री. मुश्रीफ व जिल्हाधिकारी झाले अवाक.

कोल्हापूर प्रतिनिधी :
आई अंबाबाईलाही कोरोनाची लस दिली म्हणून त्या नावावर ते पैसे उचलतील. आई अंबाबाईला त्यांच्या तावडीतून लवकरात लवकर मुक्त करा, अशी आर्जवी मागणी कोल्हापुरातील महिला कार्यकर्त्यांनी केली. राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक होत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या भ्रष्टाचारांच्या एकेका किस्स्यानी मंत्री श्री. मुश्रीफ व जिल्हाधिकारी श्री. रेखावार अवाकच झाले.
निवेदनात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कारभारातील भ्रष्टाचार, देवीच्या साडी विक्रीमधील भ्रष्टाचार, पगारी पुजा-यांच्या रखडलेल्या नेमणुका, प्रसाद विक्री या मुद्द्यांवर लक्ष वेधले आहे .
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सध्या देवस्थान समितीचे प्रशासक जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या कामकाजात भ्रष्टाचाराला थारा नाही. त्यामुळे ते चौकशी करून नक्की कारवाई करतील. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनीही आपण या प्रकरणांची गंभीर दखल घेतली असून कारवाई सुरू केली असल्याचे सांगितले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
साड्या गोरगरिबांनाही द्या…..
भ्रष्टाचाराचे किस्से सांगतानाच महिला म्हणाल्या, आई अंबाबाई हे आम्हा सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. देवीला भेट म्हणून आलेल्या साड्या उच्चभ्रू कुटुंबातील लोकांनाच दिल्या जातात, याचे कारण काय? या साड्या बहुजन समाजातील गोरगरीब माता-भगिनीनाही द्या, अशी आग्रही मागणीही महिलांनी यावेळी केली.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनिता पाटील, कार्याध्यक्षा गीता हासूरकर, शहराध्यक्षा सुधा सरनाईक, सचिव सुवर्णा मिठारी, शहर उपाध्यक्ष लता जगताप, रेशमा पवार, विद्या पवार, सुषमा डांगरे, शारदा पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या.