ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी व अभिमानास्पद: राजे समरजितसिंह घाटगे ; मुरगूड नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचाही सत्कार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शहरी भागाच्या तुलनेत कमी सुविधा असूनही ग्रामीण भागातील विद्यार्थी मेहनती शिक्षकांमुळे उल्लेखनीय यश मिळवत आहेत, हे प्रेरणादायी व अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
राजे विक्रमसिंहजी घाटगे फाऊंडेशनच्यावतीने आयोजित विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शालेय साहित्य वाटप संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू कृषी संघाचे चेअरमन अनंत फर्नांडिस होते.
राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी करिअर स्वतःच्या आवडीनुसार निवडावे. मित्र कोणती शाखा घेतो म्हणून ती घेऊ नये. एखाद्या वेळी अपयश आले तरी खचून जाऊ नये, टोकाचे पाऊल उचलू नये. अशा प्रसंगी पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे.”
या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी व स्मिता शारबिद्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे संचालक एम. पी. पाटील,दत्तामामा खराडे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, अन्नपुर्णा संचालक शिवसिंह घाटगे, राजे बँकेचे संचालक अमर चौगुले, विजय राजगिरे, अनिल अर्जुने, काॕ. शिवाजी मगदूम, प्रकाश कुंभार यांच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संकेत भोसले यांनी स्वागत केले. विशाल भोपळे यांनी आभार मानले.
…आणि सफाई कर्मचारी भारावून गेले
मुरगूड नगरपालिकेने स्वच्छता मानांकनात देशपातळीवर चौथा क्रमांक मिळवून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यावेळी भल्या पहाटे निष्ठेने काम करणाऱ्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
“स्वच्छतेच्या या सेवावृत्तीचा सन्मान करणे हा आपला राजधर्म आहे,” असे गौरवोद्गार घाटगे यांनी काढले. सत्कार व पाठबळ देणाऱ्या या शब्दांमुळे सफाई कर्मचारी भारावून गेले.