यमगे येथील मेंढपाळाचा पोरगा आयपीएस झाला ; ढोलताशांच्या गजरात फुलांची उधळण करत बिरदेव डोणेची जंगी मिरवणूक

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
केंद्रीय लोकसेवा आयोग तथा यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत आय पी एस या सुपर क्लास वन अधिकारी पदावर निवड झालेल्या बिरदेव डोणे यांचे त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या मुरगूड तसेच जन्मभूमी आणि प्राथामिक व माध्यमिक शिक्षण घेतलेल्या यमगे गावात जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी बिरदेव समवेत त्याचे आई -वडील, भाऊ-बहिण, वहिणी आणि मदत करणाऱ्या मित्राचे आई वडील असे मोजके लोकच व्यासपीठावर होते.
डॉल्बी व ढोल-ताशाचा दणदणाट, फुलांची मुक्त उधळण करीत या मिरवणुकीने इतिहास रचला. मिरवणुकीची सांगता बिरदेवच्या घरासमोरील मंडपात झाली. पिनड्रॉप सायलेन्स वातावरणातील ४० मिनिटाच्या भाषणात शिक्षक, विद्यार्थी, पालकांसाठी बिरदेवने अनेक मौलिक सल्ले दिले. सडा-रांगोळ्या व अभिनंदनाचे डिजिटल फलक यामुळे यमगे गाव आज सजले होते. पाळक ठेवून सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थित राहणे पसंत केले. या सत्काराला ग्रामस्थ, विद्यार्थी- पालक तसेच राज्यभरातील अनेक भागातून धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुरगूडातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. मुरगूड बाजारपेठ, शिंदेवाडी, यमगे स्टँड वरुन गावात मिरवणूक काढण्यात आली. शिंदेवाडीत ‘काँग्रॅच्युलेशन बिरूदादा’चे फलक व रंगीबेरंगी फुगे नाचवत शाळकरी चिमुकल्यानी केलेल्या स्वागताने बिरदेव भारावून गेला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून पुष्पवर्षाव केला. जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी खासदार संजय काका पाटील यांनी मिरवणूक मार्गातच बिरदेव यांचा सत्कार केला.
यमगेच्या प्रवेश कमानीवर उत्साही गावक-यांनी जेसीबी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. ग्रामदैवत अंबाबाई दर्शनानंतर बिरदेवच्या घराजवळील कार्यक्रमात एम. डी. देवडकर आणि विशाल पाटील यांच्या हस्ते गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बिरदेवला मदत करणाऱ्या अक्षय साळुंखे यांच्या मातापित्यांचाही हृद्य सत्कार करण्यात आला.
बिरदेव डोणे आपल्या भाषणात म्हणाले, चांगल्या शिक्षकांशिवाय चांगले विद्यार्थी घडत नाहीत. प्राथमिक शिक्षकांमधली तळमळ अन्य शिक्षणाच्या क्षेत्रातील शिक्षकांमध्ये नसते. विज्ञान क्षेत्रातून करिअर करण्याला मोठा स्कोप आहे. शिक्षण घेताना शालेय शिष्यवृत्ती आणि कमवा -शिका योजनेचा मोठा आधार मिळाला. मित्र अक्षय साळुंखेने भावासारखी मदत केली. समाजाने झगडणाऱ्याला यथाशक्ती मदत करावी. मराठी शाळेत शिकलो याचा अभिमान वाटतो. पण शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांचे सशक्तीकरण केले पाहिजे. अजित शहा यांनी दिलेली सव्वा दोन लाखाची मदत आणि बी. टी. पाटील यांची मदत नसती तर आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो नसतो. पाचवीला नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील अपयशाची मनात बोचणी होती. पण नंतर एनएमएमएस च्या यशामुळे शिष्यवृत्तीतून मोठी मदत झाली. युपीएससीचे यश हे एका दिवसाच्या अभ्यासाने मिळत नाही. अखंड निरंतर अभ्यासामुळे हे शक्य आहे. तरुणांनी झगडत्या काळात सोशल मीडियाच्या मायाजाळापासून दूर रहावे.
पालकांनी पाल्यावर करिअरबाबत दबाव आणू नये. हे सांगताना आयुष्यात एकदा का असेना यूपीएससीचा परीक्षा देण्याचा तरुणांनी प्रयत्न करावा. त्यामुळे यशापयशापेक्षा चांगला नागरिक घडण्यास मदत होईल. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर व्यक्ती प्रेरणास्थान असल्याचे मतही त्यांने मांडले. उपेक्षित बील मुलांनी प्रशासनामध्ये सेवेच्या रूपाने यावे आणि शासनाच्या निर्णय शक्तीमध्ये सहभागी झाले पाहिजे. असे मत डोणे यांनी व्यक्त केले.