आदमापूरात उड्डाणपूलाचे सेवा मार्ग खड्डयात : पावसामूळे भाविक व प्रवाशांचे प्रचंड हाल

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्रासह गोवा,आंध्रप्रदेश,कर्नाटक व अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आदमापूरचे बाळूमामा देवालय बनले आहे.पण या देवस्थानच्या प्रवेशद्वारावरच उड्डाणपूल आहे.या पूलाखाली असणाऱ्या सेवा मार्गावर मोठमोठे खड्डे,साचलेले डबके यामुळे हा मार्ग अक्षरशः खड्डयात गेला आहे.पावसामूळे भाविक व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
दर अमावस्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची प्रचंड गर्दी होते.भाविकांना त्यातूनच प्रवास करावा लागत आहे.निपाणी – मुदाळतिट्टा राज्यमार्गावर आदमापूर येथे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांचा बाळूमामा मंदिरानजीक उड्डाणपूल
बांधला आहे.पण पुलाखाली असणाऱ्या दोन्ही सेवा मार्गावर जवळपास अर्धा किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.गेल्या दिड दोन वर्षापासून या खड्ड्यांकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. अमावस्या यात्रेसाठी दोन दिवस येणाऱ्या सर्व भाविकांना खड्ड्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बाळूमामा देवस्थानाला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.प्रत्येक अमावस्येला होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाची या ठिकाणी भाविक भक्तांना सेवा सुविधा पुरवताना चांगलीच दमछाक होत आहे.येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडींचा प्रश्न आजही कायम आहे.आता तर पावसाळ्यामध्ये या परिसरातून प्रवास करताना किंवा उड्डाणपूलाच्या खालून पायी चालत जाणाऱ्या भाविकांसह प्रवाशांना दोन्ही बाजूच्या सेवा मार्गावर पडलेल्या खड्यांचा त्रास सहन करावा लागतोय.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आदमापूर येथे बाळूमामा मंदिरानजीक ‘उड्डाणपूल’ बांधला खरा,पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनाचा अभाव, पोलीसांचे दुर्लक्ष अशा कारणांमुळे हा ‘उड्डाणपूल’ असून अडचण नसून खोळंबा अशा आवस्थेतच आहे.गर्दीच्या दिवशी हा पूल गाड्या पार्किंगचे ठिकाणच बनलेला असतो.बेशिस्त पार्किंग व प्रशासनाच्या या बेफिकिरीचा त्रास सर्वानाच सहन करावा लागत असतो.पण आता पावसाळ्यामध्ये पूला खालून जाणाऱ्या सर्वांना खड्ड्यातून जाण्याचाही त्रास सहन करावा लागत आहे.याकरिता प्रशासनाने ठोस पाऊले उचलली पाहिजेत.
हायब्रीड ॲम्युनिटी या प्रायोगिक तत्त्वावर सार्वजनिक बांधकाम विभागाने निपाणी – फोंडा राज्य मार्गाचे कोट्यवधी रुपये खर्चून नूतनीकरण केले.पण या मार्गाचे नूतनीकरण करताना प्रचंड प्रमाणावर त्रुटी राहून गेलेल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची त्रुटी म्हणजे आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान परिसरामधील मुदाळतिट्या – पासून वाघापूर पाटी पर्यंत च्या परिसरात होणारी भाविकांची गर्दी,प्रवाशांची संख्या,वाहनांची संख्या लक्षात न घेता हा मार्ग नूतनीकरण करण्यात आला आहे. परिणामी सध्या या सर्व गोष्टींचा त्रास भाविकांसह प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे.त्यामुळे शेकडो कोटी रुपये खर्चून हा मार्ग सध्या खड्ड्यात गेल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.
हा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकामच्या कागल विभागाकडे असताना बांधला आहे.पुला खालील दोन्ही बाजूचे सेवामार्ग हे स्थानिक प्राधिकरणाकडे येतात.त्यांनीच त्याची देखभाल करावी लागणार आहे.पण त्यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.