उन्हाचा चढता पारा , शेतमजुरांचे आठ – बारा ; वाढत्या उष्म्याने शेतीकामाचे वेळापत्रक बदलले , सकाळच्या सत्रात कामाला प्राधान्य.

बिद्री प्रतिनिधी : आकाश वारके
फाल्गुनातच वैशाख वणव्याच्या झळा सर्वांना सहन कराव्या लागत असल्याने अंगाकडून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. याचा परिणाम थेट शेतीकामांवर झाला असून शेतकरी व शेतमजूर यांनीही कामांच्या वेळापत्रकात बदल करत सकाळच्या सत्रात कामाला अधिक पसंती दिली आहे.त्यामुळे सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंतच शेतकरी शेतात दिसत असून त्यानंतर संपूर्ण शिवारे रिकामी होत आहेत.
दरवर्षी एप्रिलच्या मध्यापासून राज्यात कमाल तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे जातो. मात्र यंदा मार्च महिन्यातच पाऱ्याने ४० चा आकडा पार करत सर्वांना घाम फोडला आहे. सूर्य जणूकाही आग ओकू लागल्याने उन्हाचे असह्य चटके बसत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे फाल्गुन महिन्यातच वैशाख वणवा झेलण्याची वेळ सर्वांवर आली आहे.
उन्हाच्या वाढत्या तिव्रतेमुळे सर्वसामान्यांच्या दिवसभराच्या कामावर याचा परिणाम होऊ लागला आहे. नागरिकही आपली कामे सकाळच्या सत्रातच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असून दुपारपूर्वी कामे उरकण्यासाठी सर्वजण प्राधान्य देत आहेत. याचा परिणाम शेतीकामावरही झाला असून शेतकरी आणि शेतमजूर सकाळीच शेतावर हजेरी लावत आहेत.
सध्या जिल्ह्यातील साखर हंगाम संपल्याने तोडून गेलेल्या ऊसाचे खोडवा पीक, नविन केलेल्या लागणी यामध्ये भांगलण, खुरपणी, पाणी देणे, औषध फवारणी, खोडवा ऊसाची भरणी करणे आदी कामे सुरु आहेत. यासाठी शेतमजूरांची आवश्यकता भासत आहे. शेतमजुरांनी वाढत्या उन्हामुळे सकाळच्या सत्रात शेतीकामासाठी प्राधान्य दिल्याने पहाटेपासूनच शिवारात लगबग दिसत आहे.
गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात दुपारनंतर वादळ वार्यासह पाऊस हजेरी लावत असल्याने शेतमजूर व शेतकरी सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत शेतीकामासाठी हजेरी लावत आहेत. यासाठी मजुरांना दिवसा १०० ते १२० रुपये हजेरी दिली जात आहे. उन्हापासून बचाव होण्यासाठी शेतकरी व शेतमजुरांनी आपल्या कामाचे वेळापत्रक बदलले आहे. यामुळे शेतशिवारं सकाळी गजबजून जात असून दुपारनंतर ती ओस पडत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
” उन्हाच्या वाढत्या तिव्रतेचा परिणाम शेतीच्या वेळापत्रकावर झाला असून शेतमजूर सकाळीच शेतकामासाठी येण्याची तयारी दाखवत आहेत. दिवसभर उन्हात काम करताना होणारा उन्हाचा त्रास वाचावा म्हणून सकाळी आठ ते बारा या वेळेत शेतांमध्ये सर्वांची धांदल सुरु आहे. दुपारनंतर शिवारं मोकळी पडत आहेत. “
– रमेश साठे , शेतकरी , बोरवडे .