कागल ची जनता येत्या काळात त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही : राजे समर्जीतसिंह घाटगे ; अशोभनीय ,एकेरी भाषा वापरणे आमचे संस्कार नव्हेत

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी,समोर माता-भगिनी असताना आमदार हसन मुश्रीफ अशोभनीय वक्तव्ये करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आदर्श कागलची बदनामी करीत आहेत,याचे भान त्यांनी ठेवावे.अन्यथा कागलची जनताच येत्या काळात त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिला. मुरगुड येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी राजे समरजितसिंह घाटगे यांचा ओबीसी आरक्षण,प्रामाणिकपणे कर्ज भरणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान व वीज बील सवलतीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल नागरिकांनी सत्कार केला.
ते पुढे म्हणाले, एकीकडे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेता तर दुसरीकडे तुम्ही अशोभनीय वक्तव्य करता,तुमच्या सांगण्यावरून तुमचे बगलबच्चे महिलांच्या बाबतीत अवमानकारक एकेरी वक्तव्ये करतात. स्व राजेसाहेब मला नेहमी सांगत असत की प्रत्येक माणूस आपल्यावरील रक्ताच्या संस्काराप्रमाणे बोलतो. मुश्रीफसाहेब यांनी जे सांगितले तेच प्रकाश गाडेकर व त्यांचे बगलबच्चे बोलत आहेत. आम्हालाही बोलता येते. त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याबाबत कार्यकर्ते आग्रह करीत आहे. परंतु आमच्यावरील संस्कार या खालच्या थराच्या भाषेला त्याच शब्दात उत्तर द्यायला परवानगी देत नाहीत.
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील म्हणाले,बदलत्या राजकारणात खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याच्या घेतलेल्या धाडसी निर्णयाबद्दल अभिनंदन करतो.त्यामुळे जिल्ह्यातील व कागल तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. समरजितसिंह घाटगे शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यत, पारदर्शीपणे पोचवत आहेत. स्वतः राजे असूनही जनतेचे सेवक म्हणून ते काम करीत आहेत.हे अभिमानास्पद आहे. यावेळी प्रताप पाटील, संतोष गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडीस, दत्तामामा खराडे , विलास गुरव , विजय राजीगरे, अमर चौगुले , सदाशिव गोधडे , अनिल अर्जुने, बजरंग सोनुले, युवराज कांबळे, राहूल खराडे, सुरेश गोधडे आदी उपस्थित होते.
स्वागत संग्राम साळोखे यांनी केले.आभार अमर चौगुले यांनी मानले.
सौ.घाटगे यांच्या एकेरी उल्लेखाबद्दल निषेध……
कालच प्रकाश गाडेकर यांनी आमदार हसन मुश्रीफ उपस्थित असताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याच्या स्नूषा व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांचा एकेरी शब्दांत उल्लेख केला.त्यांच्यासह त्यानी समस्त महिला वर्गाचा त्यांनी अवमान केला आहे.त्याबद्दल श्री.गाडेकर यांचा व त्यांना प्रोत्साहन देणारे आमदार मुश्रीफ यांचा प्रताप पाटील यांनी जाहिर निषेध केला.