बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमागे केवळ सत्ता काबीज करणे हाच उद्देश : राज ठाकरे यांची सरकारवर टीका.

नाशिक :
महानगरपालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तयार केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची या प्रस्तावाला संमती असून, काँग्रेसमध्ये काहीसा संभ्रम आहे. यावर नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमागे केवळ सत्ता काबीज करणे हाच उद्देश असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धत ही सत्ताधाऱ्यांची सोयीची असते. अशी पद्धत कोणत्याही राज्यात नाही. एकच उमेदवार हीच पद्धत आहे. अचानक हे महाराष्ट्रात कुठून सुरु झालं. यामागे सत्ता काबीज करणे हाच उद्देश आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीवर सरकारनं स्पष्टीकरण द्यायला हवं, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
आपल्याला हवे तसे प्रभाग करणे हे योग्य नाही. महापालिका निवडणुकीची थट्टा करुन ठेवली आहे. जनतेला गृहित धरलं जातंय, असेही ते म्हणाले.
आमदार, खासदार निवडणुकीवेळी वेगवेगळे प्रभाग करणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.
राज्यात सत्तेत आल्यावर महाविकास आघाडी सरकारने महापालिका निवडणुकांसाठी ‘एक वॉर्ड, एक सदस्य’ प्रभाग पद्धतीचा कायदा मंजूर करून घेतला होता. मात्र, आता दोन वर्षांनंतर ‘एक वॉर्ड, एक सदस्य’ प्रभाग पद्धतीवरून यू टर्न घेत राज्यातील प्रमुख १५ महापालिकांच्या तोंडावर पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.