पैसाफंड बँकेने पैशाबरोबर विश्वासही जपला; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार; कसबा सांगावमध्ये बँकेच्या आठव्या शाखेचे उद्घाटन.

कसबा सांगाव :
हुपरीच्या श्री. पैसाफंड शेतकी सहकारी बँकेने सभासदांच्या पैशाबरोबर विश्वासही जपला, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. कसबा सांगाव ता. कागल येथील बँकेच्या आठव्या शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ जिल्हापरिषद सदस्य युवराज पाटील -बापू होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, सहकारात संस्था लोकाभिमुख पद्धतीने पारदर्शक कशा चालवाव्यात, याचा वस्तुपाठ कै. आ. बा. नाईक- बाबा आणि कै. एल. वाय. पाटील- दादा यांनी घालून दिला. त्यानी घालून दिलेल्या मार्गावरूनच या संस्थेची वाटचाल सुरू आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. ठेवी आणि कर्जे यापलीकडे जाऊन समाजोपयोगी कार्यातही ही संस्था नेहमीच आघाडीवर राहिली आहे. ठेवी स्वीकारण्याचा, कर्जे देण्याचा आणि शेतीसाठी कर्ज देण्याचा परवाना असलेली ही महाराष्ट्रातील एकमेव शेतकी बँक आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील-बापू म्हणाले, महाराष्ट्रात बँकिंग क्षेत्र विस्तारले नव्हते त्या काळात शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी कर्जपुरवठा करणारी ही महाराष्ट्रातील पहिली शेतकी बँक आहे.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब भोजे, उपाध्यक्ष शामराव गायकवाड, कार्यकारी संचालक शिवराज नाईक, सरपंच रणजीत कांबळे, उपसरपंच विक्रम जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.
विना सहकार -नही उद्धार……
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणत असताना सहकारधुरीणानी आदर्श अशी उदाहरणे घालून दिलेली आहेत. वि. खे. पाटलांचा पहिला सहकारी साखर कारखाना असो, क्रांतिवीर नागनाथअण्णांचा हुतात्मा साखर कारखाना असो. तसेच अन्य सहकारी संस्था. सहकारात आपण संस्थेचे मालक नाही, विश्वस्त आहोत, या भावनेने काम करणे गरजेचे आहे. सहा वर्षापूर्वी केडीसीसी बँकेला असलेला १३७ कोटी रुपयांचा संचित तोटा भरून काढून, आजघडीला बँक १५० कोटींच्या ढोबळ नफ्यावर आणली आहे. या भावनेतूनच यापुढेही काम केले तरच सहकार टिकेल आणि सहकारातून जनतेचा उद्धार होईल.
स्वागत बँकेचे अध्यक्ष आण्णासाहेब भोजे यांनी केले. प्रास्ताविकपर भाषणात कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.