कागल तालुक्यातील पहिली मानाची दहीहंडी गडहिंग्लज च्या संघर्ष ग्रुप गोविंदा पथकाने फोडली ; मुरगूड मध्ये मंडलिक प्रेमीतर्फे आयोजन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील पहिली मानाची एक लाख रुपये बक्षिसाची भव्य दहिहंडी गडहिंग्लज च्या संघर्ष ग्रुप गोविंदा पथकाने फोडली.कागल तालुक्यातील मुरगूड येथे मंडलिक प्रेमी यांचेवतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
रिमझिम बरसणाऱ्या पाऊस धारा आणि गोविंदा पथकांच्या उत्साहात मुरगूड येथील कन्या शाळेच्या पटांगणावर सायंकाळी सात वाजता मंडलिक प्रेमी दहिहंडी स्पर्धेला मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला.
पहिल्यांदाच स्पर्धेत उतरलेले श्रीकृष्ण गोविंदा मंडळ सोळांकूर आणि वाघाची तालीम मंडळ आजरा या दोन गोविंदा पथकाने सलामी दिली.पहिला मान संघर्ष ग्रुप,गडहिंग्लज ( गोविंदा : यश कांबळे ) या गोविंदा पथकाला मिळाला.
पहिल्याच प्रयत्नात सहा थर लावून संघर्ष ग्रुप,गडहिंग्लज या गोविंदा पथकाने ११ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.नेताजी पालकर व्यायाम मंडळ, गडहिंग्लजने सहा थरांची सलामी दिली.व ११ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.
दहीहंडी ची उंची ३९ फूट होती.ती दुसऱ्या फेरीत ३७ फूटावर आणण्यात आली.दुसरी फेरी संघर्ष ग्रुप आणि नेताजी पालकर यांच्यात मैत्रीपूर्ण झाली. नेताजी पालकर पथकाने चढाई केली.पण त्याचा प्रयत्न असफल ठरला.त्यानंतर संघर्ष ग्रुपने चढाई केली.सहा थरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला.पण त्यांचाही हा प्रयत्न अयशस्वी ठरला.त्यानंतर ३५ फुटावर दहीहंडी आणण्यात आली.व तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली.
नेताजी पालकर पथकाने चढाई करताना पाच थरापर्यंत च मजल मारली.त्यानंतर अतिशय चुरशीने संघर्ष ग्रुपच्या गोविंदाने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला.पण तो प्रयत्न फसला. संयोजकांनी तीन फुटाने ३२ फुटावर हंडी खाली घेण्याचा निर्णय घेतला.त्यावेळी संघर्ष ग्रुपने सात थरांची चढाई करुन दहीहंडी फोडली आणि हे गोविंदा पथक लाखाच्या बक्षीसाचे मानकरी ठरले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण अँड.विरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते आनंदराव फराकटे,माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके,माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले,माजी नगरसेवक सुहास खराडे,शिवाजीराव चौगले,अविनाश पाटील, सत्यजित पाटील – सोनाळीकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
दरम्यान या दहीहंडी स्पर्धेसाठी आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कांही काळ हजेरी लावली होती.स्पर्धेला शुभेच्छा देवून ते पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले.
यावेळी सत्यजित पाटील,अँड.सुधीर सावर्डेकर,वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल पाटील,सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी करे, सुखदेव येरुडकर, दत्ता मंडलिक,अरुण मेंडके,साताप्पा कांबळे,दगडू शेणवी,जगन्नाथ पुजारी,संजय मोरबाळे आदी उपस्थित होते.स्पर्धेसाठी सागर बगाडे,प्रमोद पाटील व सार्थ सागर फौंउंडेशनचे सहकार्य लाभले.राजेंद्र बनसोडे,विनायक सुतार यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.माजी खासदार संजय मंडलिक व पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरिक्षक विरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलिक प्रेमींच्या वतीने या स्पर्धा पार पडल्या.