कोल्हापूर : अपघाताचा बनाव करून मुलानेच केला वडिलांचा खून; केनवडे येथील घटना; कागल पोलिसांनी २४ तासात केला गुन्हा उघड

कागल प्रतिनिधी :
वडिलांच्या अपघाताचा बनाव करून मुलानेच आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी पारने वार करून हत्या केल्याचा गुन्हा कागल पोलिसांनी उघडकीस आणला आहे .या अपघाताबाबत पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तपास उलट्या दिशेने सुरु ठेवला होता. तपासातून हा अपघात नसून घातपाताची शंका व्यक्त केली गेली . अन् खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली . कागल पोलिसांनी संशयित आरोपी अमोल दत्तात्रय पाटील याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती करवीरचे पोलिस उपअधिक्षक आर. आर . पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक वाकचौरे उपस्थित होते .
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ३० ऑगष्ट रोजी कागल – निढोरी मार्गावर केनवडे ओढ्याच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दत्तात्रय रामचंद्र पाटील यांचा अपघात झाल्याची फिर्याद कागल पोलिसात दाखल झाली होती. याचा पंचनामा करण्यासाठी पोलिस गेले असता दत्तात्रय पाटील यांच्या अंगावर इतरत्र कोठेही ईजा झाली नव्हती. फक्त डोकीलाच जबर मार लागला होता. यावरून पोलिसांना घातपात झाल्याचा संशय आला . सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक वाकचौरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवली . या तपासात पोलिसांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले .दत्तात्रय पाटील हे कामानिमित्त इचलकरंजी येथे रहात असे . दोन महिन्यातून एकदा ते घरी येत असे. पत्नी व मुलगा अमोल पाटील यांना दारू पिऊन वारंवार घरात भांडणे काढत असे. याचा राग मनात धरुन अमोल याने वडिलांच्या डोकीत लोखंडी पारने वार करुन त्यांची हत्या केली व अपघात झाला असल्याचा बनाव केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे .

करवीरचे पोलिस उपअधिक्षक आर. आर . पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक वाकचौरे यांनी आपले सहकारी विजय पाटील, महादेव बिरंजे, विनायक औताडे, आनंदा कोंडरे, संदेश पोवार, सिल्वा कोडनाईक यांच्या साथीने या प्रकरणाचा छडा लावला . याबद्ल उपअधिक्षक आर. आर . पाटील यांनी या टीमचे अभिनंदन केले .