सर्वसामान्यांच्या आशीर्वादाची शिदोरी आयुष्यभर पुरेल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार ; सिद्धनेर्लीत सत्कार समारंभ उत्साहात

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गेल्या 35- 40 वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीमध्ये सर्वसामान्य जनता खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. सर्वसामान्यांच्या आशीर्वादाची ही शिदोरी संपूर्ण आयुष्यभर पुरेल, असे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
सिद्धनेर्ली ता. कागल येथे मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल श्री. मुश्रीफ यांच्यासह श्री. सिद्धेश्वर सहकारी दूध संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांसह गुणवंतांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद महानगरपालिकेलाही अशीच साथ द्या याच लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये आम्ही करणार आहोत. विधानसभेच्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आम्ही वचन दिले आहे. येत्या एक-दोन वर्षात आम्ही केंद्र शासनाशी बोलून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत. महात्मा फुले आरोग्यदायी योजना या योजनेला आता मोठी रक्कम प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आता मुंबई पुण्याला पेशंटला घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. आता कोल्हापूरातच या सर्वांची ऑपरेशन होतील. सिद्धनेर्लीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग करण्याबाबत मागील शासनाने ठरविले होते. त्यानंतर निवडणुकीच्या काळात माझ्या पुढाकाराने त्याचे कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून रद्द करण्याबाबतचे नोटिफिकेशन काढून आणले. आता हा रस्ता पुन्हा होत असल्याची माहिती समजते. कागल तालुक्यातून हा रस्ता येऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेली आहे. त्यासाठी मी प्रयत्नही करणार आहे.
सरपंच दत्तात्रय पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी सिद्धनेर्लीसाठी दिलेल्या विकासकामांसाठीच्या भरघोस निधीमुळे गावाचा कायापालट झाला आहे.
व्यासपीठावर गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, तालूका संघाचे संचालक कृष्णात मेटील, माजी सरपंच वाय. व्ही. पाटील, दादासो पाटील, राहुल मगदूम, सुभाष मगदूम, मोहन लाड, उज्वला पवार, संदीप पाटील आदींची उपस्थिती होती.
युवराज खद्रे यांनी स्वागत केले. शाहीर सदाशिव निकम यांनी आभार मानले.
दूध संस्थेत ऐतिहासिक विजय…..!
सिद्धनेर्लीसह पंचक्रोशीतील श्री. सिद्धेश्वर दूध संस्था ही एक मोठी व नावलौकिक असलेली संस्था आहे. या संस्थेच्या निवडणुकीतील विजय हा ऐतिहासिक आहे. ही संस्था राज्यात अग्रेसर राहील यासाठी सर्व संचालकानी प्रयत्न करावेत, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.