पाच हजार रुपयांची लाच घेताना महापालिकेचा बीट मुकादम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

मालेगाव शहरातील जम जम प्राथमिक व जन्नत माध्यमिक विद्यालयाच्या अनधिकृत बांधकाम संदर्भात कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करावा व अनधिकृत बांधकाम अतिक्रमण प्रकरणी कारवाई करावी यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना मालेगाव महानगरपालिकेतील बीट मुकादम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. मनोहर बाबुलाल ढिवरे (वय- ४५ बिट मुकादम, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव, जिल्हा नाशिक) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या मुकादमाचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.2) केली.
याबाबत 41 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी जम जम प्राथमिक व जन्नत माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील अनधिकृत बांधकामाबाबत कायदेशीर कारवाईसाठी मालेगाव महानगरपालिका येथे अर्ज दिला होता. त्या अर्जानुसार प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यासाठी व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी बीट मुकादम मनोहर ढिवरे यांनी तक्रारदार यांचेकडे गुरुवारी 10 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता, मालेगाव महापालिकेतील बीट मुकादम मनोहर ढिवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच स्वीकारताना ढिवरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. मनोहर ढिवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी, पोलीस अंमलदार, सचिन गोसावी, शरद हेबांडे, विलास निकम, परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.