ताज्या बातम्यामहाराष्ट्र

हसन मुश्रीफांच्या ‘त्या’ पत्रिकेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झळकले ; कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा सुरु होताच मुश्रीफांनी केला खुलासा !

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण दिवसेंदिवस बदलत चालले आहे. मागील काही महिन्यांपासून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्या घरावर आणि जिल्हा बँकेवर ईडीकडून छापे टाकण्यात आले होते. कारखान्याच्या कर्ज प्रकरणावरुन हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. तसेच ईडीकडून त्यांच्यावर 35 कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा (FIR) दाखल केल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहेत. आता हसन मुश्रीफ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या पोस्टरमुळे ते चर्चेत आले आहेत.

मागील काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारकडून कोल्हापुरात शासन आपल्या दारी हे कार्यक्रम घेण्यात आले होते. यावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या एका जाहिरातीवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच आता असेच एक पोस्टर व्हायरल होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रम पत्रिकेवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. हसन मुश्रीफ यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींचे फोटो अपेक्षीत असताना त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत आहे.

गडहिंग्लजमध्ये येत्या 28 जूनला राज्य सरकार आणि हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. यासाठी कार्यक्रम पत्रिकाही छापण्यात आल्या आहेत आणि यातीलच एक कार्य़क्रम पत्रिका व्हायरल होत आहे. या पत्रिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण या कार्यक्रम पत्रिकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दिसत आहेत. यामध्ये इतर नेत्यांचा एकही फोटो दिसत नसल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.

हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण…..

यावर हसन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शासन आपल्या दारी मधील बहुतांशी योजनांचा जन्म मी मंत्री असताना झाला आहे. आताचं सरकार केवळ या योजना जनतेपर्यंत पोहोचवत आहे. ही योजना कशी राबवली जाते हे राज्याला दाखवून देण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे. पण शासकीय योजना यशस्वी करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे, हे मी कधीपासून सांगत आलो आहे.

राष्ट्रवादीमार्फत आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे. यामध्ये महाविकास आघाडीच काहीही संबंध येत नाही. शासन आपल्या दारी कार्यक्रमाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी घोषणा केली आहे. म्हणून त्यांचे फोटो आहेत. आणि राष्ट्रवादी म्हणून शरद पवार आणि अजित पवारांचे फोटो आहेत. त्यामुळे कुणीही गैरसमज करुन घेण्याची गरज नाही. ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नसल्याचे मुश्रीफ म्हणाले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks