शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर समाजाचे शिक्षक व्हावे : डॉ. कमळकर

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांची नोकरी संपत असली तरी त्यांची जबाबदारी संपत नाही. म्हणून त्यांनी सेवा निवृत्तीनंतर समाजाचे शिक्षक बनायला हवे, असे मत कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. जी.बी. कमळकर यांनी व्यक्त केले.
विद्या मंदिर बेलवळे बुद्रुक ( ता. कागल ) शाळेचे मुख्याध्यापक के. तु . कांबळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री केंद्राचे केंद्रप्रमुख विलास पोवार होते.
यावेळी डॉ. कमळकर म्हणाले,के.तु . कांबळे यांनी आपल्या कार्यकाळात उत्तम प्रशासकाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच शाळेचा जिल्हाभर नावलौकिक झाला. त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोदगारही त्यांनी यावेळी बोलताना काढले.
याप्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी सारिका कासोटे , आर. व्ही. कांबळे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप जाधव यांनी केले. सूत्रसंचालन विश्वनाथ डफळे व गितांजली खोत यांनी केले तर आभार अंकुश माने यांनी मानले.