ताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावी-बारावीची जूनमध्ये परीक्षा ? सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय

सोलापूर :

राज्यातील 32 लाख विद्यार्थ्यांची दहावी-बारावीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरु होणार आहे. मात्र, राज्यात कडक निर्बंध लागू करूनही 1 ते 9 एप्रिल या काळात चार लाख 33 हजार रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे या नऊ दिवसांत तब्बल अडीच हजार मृत्यू झाले असून पावणेदोन लाख ऍक्‍टिव्ह रूग्ण वाढले आहेत. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी राज्यात तीन आठवड्यांचा लॉकडाउन करावा, अशी मागणी राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्र्यांनी केली आहे. विद्यार्थी-पालकांच्या मनात भितीचे वातावरण असल्याने दहावी-बारावीची परीक्षा जुनमध्ये होतील, अशी शक्‍यता आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत सोमवारी अंतिम निर्णय होऊ शकतो, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वर्षा गायकवाड यांची सोमवारी बैठक
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट, आरोग्य सुविधांवरील ताण, ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिरची वाढलेली मागणी, डॉक्‍टरांची कमतरता या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून आगामी काही दिवसांत योग्य तो निर्णय घेतला जाईल. तत्पूर्वी, काही मंत्र्यांनी व बहुतेक लोकप्रतिनिधींनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी राज्यात तीन आठवड्यांचा लॉकडाउन करण्याची गरज असल्याचे मत मदत व पुनवर्सन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जूनमध्ये परीक्षा होईल, अशी शक्‍यता शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे. दरम्यान, ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्याची आमची तयारी आहे, असे पुणे बोर्डाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, जळगाव, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, लातूर, भंडारा, जालना, बीड, नगर या जिल्ह्यांसह कल्याण-डोंबविलीतही सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत. दररोज सरासरी 57 ते 59 हजारांच्या पटीत रुग्ण दररोज वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आता पुणे बोर्डानेही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, आमदार रोहित पवार, अशिष शेलार यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींसह पालकांनी केली आहे. तत्पूर्वी, बोर्डाने उत्तरपत्रिका, पुरवणी पत्रिका, आलेख वगैरे परीक्षा केंद्रांवर पाठविले आहेत. अजूनही परीक्षा केंद्रे निश्‍चित झालेली नाहीत, तरीही ज्या शाळांमधील दहावी अथवा बारावीच्या मुलांची किमान संख्या 50 आहे, अशा शाळांमध्येच विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देता येईल, असे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज्यातील कोरोना वाढीचा वेग चिंताजनक मानला जात असून नगर विकास विभागाने शुक्रवारी (ता. 9) आदेश काढून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदांमधील स्थायी समिती, विषय समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून आरोग्य सुविधांवर ताण येत असल्याची चिंता व्यक्‍त करीत महिन्यानंतर त्याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील भिती, त्यांच्या मानसिकतेवरील परिणाम आणि त्याचा परीक्षेवर होणारा परिणाम, याचा विचार करून दहावी-बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात येतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

रुग्णांबरोबरच मृत्यूदरही वाढू लागल्याने पालक चिंतेत

अनेक विद्यार्थी तसेच त्यांचे पालक तथा त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बहुसंख्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही, अशीही स्थिती राज्यात आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांबरोबरच मृत्यूदरही वाढू लागल्याने पालक चिंतेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या संधीवेळी परीक्षा आपल्या पाल्याने द्यावी, अशीही पालकांची भावना आहे. या पार्श्‍वभूमीवरही परीक्षा पुढे ढकलली जाण्याची शक्‍यता आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks