नवऱ्याची एक गोष्ट बाहेर काढा, मी राजकारणातून बाहेर पडेन!

कोल्हापूर प्रतिनिधी :
मी तुमच्या बायकोवर बोलत नाही. तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता ? त्यांचा या राजकारणाशी काही संबंध नाही. माझ्या नवऱ्याची एक गोष्ट बाहेर काढा, मी राजकारणातून बाहेर पडेन, असे आव्हान भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना आज (सोमवार) दिले.
वाघ म्हणाल्या की, जेव्हा राजकारणात कोणते मुद्दे चर्चेला मिळत नाहीत. तेव्हा वैयक्तिक मुद्यावर बोललं जातं. बंटी पाटील हेच करत आहेत. तुम्ही कोल्हापूरचे पालक आहात, मालक नाही. अनेक महिलांवर अत्याचार आणि बलात्कार होत आहे. या महिल्यांच्या अत्याचारावर गृहराज्यमंत्र्यांनी बोलावं, असे वाघ म्हणाल्या.
मुक्त सैनिक वसाहत परिसरात भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ चित्रा वाघ यांची सभा रविवार रात्री आयोजित केली होती. ही सभा सुरु असताना व्यासपीठाच्या मागील बाजूस दोन अनोळखी तरुणांनी व्यासपीठाच्या दिशेने दगडफेक केली होती. या घटनेवर चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा घटना घडणे लाजीरवाणे असल्याची टीका वाघ यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर केली होती. त्यानंतर पाटील यांनी वाघ यांच्यावरही टीका केली होती. या टीकेला वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.