शेणगांव येथे ऊसाच्या फडाला आग लागून दीड एकर ऊस जळून खाक; सुमारे दोन लाखाचे नुकसान
लागलेली आग पाहून शेकडो लोग आगीच्या दिशेने धावत सुटले. आगच इतकी भिषण होती की क्षणात या परिसरातील सारा आसमंत धुराने काळवंडला. सांऱ्याच्या मनात धास्ती निर्माण झाली.

गारगोटी प्रतिनिधी :
आज गुरूवार दिनांक ११/११/२०२१ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शेणगांव ( ता. भुदरगड ) येथील गारगोटी-पाटगांव रोडशेजारील चार पाच शेतकऱ्यांचा मिळून दिड एकरातील ऊस अचानक लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले.
आज दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास गावाशेजारील या ऊसाच्या पडाला उत्तर पुर्व बाजूने आग लागली. येथील शेतकरी आप्पा पाटील यांच्या ऊसाने पेट घेतला. दरम्यान लागलेली आग पाहून शेकडो लोग आगीच्या दिशेने धावत सुटले. आगच इतकी भिषण होती की क्षणात या परिसरातील सारा आसमंत धुराने काळवंडला. सांऱ्याच्या मनात धास्ती निर्माण झाली.

आगीला रोखणार तरी कसे? साऱ्यांना प्रश्न पडला. ही आग शिरीष कोरे व सुनिल कोरे यांच्या फडात शिरली. पुर्ण वाढ झालेला पोसलेला ऊस आणखी जोराने भडकला. आगीची भयानकता पाहून ही आग रोखण्यासाठी सुमारे ५० तरूण आग रोखण़्यासाठी फडात एका बाजूने शिरले. आग जवळ येण्याअगोदरच ठराविक अंतरावर या फडाला लगोलग ऊस तोड करून शर्थीने भांग पाडला. आग आटोक्यात आणली.
कडक ऊंन्हाच्या तडाख्यात हे सारे घडून आले. दरम्यान वाराही संथ होता, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता, असे मत या नुकसानग्रस्त शेतकरी सुनिल कोरे यांनी व्यक्त केले. आगीमूळे नुकसान झालेले शेतकरी आप्पा पाटील, बाळासो शेणवी, शिरिष कोरे, सुनिल कोरे, विद्यानंद कोरे आदी हतबल झाले. तर ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.
दरम्यान या जळून खाक झालेल्या ऊसाच्या फडाची बिद्री साखर कारखान्याच्या शेतकी विभागाने पाहाणी केली. बिद्री साखर कारखान्याचा करार असल्याने हा कारखाना अद्याप सुरु व्हायचा असल्याने या शेतकऱ्यांना हा ऊस पाठवायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेणगांवचे पोलीस पाटील विजय साळोखे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती व छायाचित्रे वरिष्ठांना दिली.
बिद्रीकडून आशा…
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पाहणी करायला आलेल्या बिद्री सहकारी कारखान्याच्या अधिकारी वर्गाकडे उस पुढील एक ते दोन दिवसात तोडून नेण्यासाठी विनवणी केली. सदरील सर्व शेतकऱ्यांचा करार हा बिद्री कारखान्यासोबत असल्याने सर्व शेतकऱ्यांचे बिद्रीच्या निर्णयाकडे डोळे लागले आहेत.