दलित समाजातील तरुणासाठी कागलमध्ये लवकरच व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा : समरजितसिंह घाटगे; डिक्की (पुणे) आणि शाहू कागल समूहाचा कागल यांचा संयुक्त उपक्रम

कागल प्रतिनिधी :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भरीव कार्य केले आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवीत दलित समाजातील तरुणांना उद्योजक बनवून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) आणि शाहू समूह एकत्र येणार असून त्यासाठीचा सामंजस्य करार पूर्ण झाला आहे.
दिवाळीनंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलमध्ये आम्ही व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे.अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
डिक्कीचे संस्थापक पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे स्वतः या याबाबतचे मार्गदर्शन करणार आहेत. याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
याबाबत अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले,बहुजन समाजातील तरुणांना उद्योग-व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येऊन काम करूया, असा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच शाहू समुहातर्फे मी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) समोर ठेवला होता. त्यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत एकत्र काम करण्याचे कबूल केले होते. त्याबाबतचा सामंजस्य करार नुकताच पूर्ण झाला. आता इथून पुढे पश्चिम महाराष्ट्रातील बहुजन समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) आणि शाहू समूह एकत्रितपणे काम करणार आहोत.
बहुजन समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आणि समाजाचा विकास करण्याचे व्रत माझे पणजोबा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हाती घेतले होते. त्यानंतर माझे वडील स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यासाठी खर्ची घातले. आणि आता त्यांचाच वारसा पुढे चालवत शाहू समूहाच्या माध्यमातून मी हे एक मोठे पाऊल उचलत आहे.यामध्ये जास्तीत जास्त दलित समाज बांधव सक्षम व स्वावलंबी झाले पाहिजेत हाच मुख्य उद्देश आहे.
स्टॅन्ड अप इंडियाचा लाभ तरुणांना देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केंद्र शासनामार्फत युवकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्टॅन्ड अप इंडिया अंतर्गत कौशल्य विकासावर आधारित विविध कोर्सेस व अनुदानाच्या योजना सुरू केल्या आहेत. याची अधिक माहिती मी वेळोवेळी केंद्रीय मंत्रालयाशी संपर्क साधून घेत आहे.आधुनिक शेती, डेअरी व संलग्नित उद्योगात तरुणांना पुढे आणण्यासाठी व केंद्र शासनाच्या अनेक योजना, विविध व्यवसाय संधी यांची माहिती देऊन त्याबाबतचे मार्गदर्शन ही आम्ही करणार आहोत. असेही श्री. घाटगे यांनी स्पष्ट केले.