कोल्हापूर : कोयना, महाराष्ट्र एक्स्प्रेस धावणार इलेक्ट्रिक इंजिनवर

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गावर डिझेल इंजिनऐवजी आता इलेक्ट्रिक इंजिन वापरले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रदूषण आता कमी होणार आहे. 3 जूनपासून त्याचा प्रारंभ होणार आहे.
पहिल्या टप्प्यात कोल्हापूर-मुंबई ‘कोयना एक्स्प्रेस’ आणि कोल्हापूर-गोंदिया ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ या दोन गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार आहेत. वर्षअखेरपर्यंत या मार्गावरील सर्वच गाड्या इलेक्ट्रिक इंजिनसह धावतील. कोल्हापूर-मिरज या 48 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
मिरज ते पुणे या मार्गाचे दुहेरीकरण सुरू आहे. मात्र त्यापैकी एका मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे कोल्हापूर-पुणे असा विद्युतीकरणाचा एक मार्ग खुला झाला आहे. या मार्गावर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक इंजिन वापरण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याची तयारी रविवारपासून सुरू करण्यात आली आहे.