नवदुर्गेच्या रुद्रावताराने कळे पोलीस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर

कळे -वार्ताहर अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या कळे परिसरात बंद असलेल्या अवैद्य धंद्याला ऊत आला आहे. नवरात्री काळातच मटका अड्ड्यावर जाऊन एका नवदुर्गेने पायातले हातात घेऊन नवऱ्याचा समाचार घेतल्याने कळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका निर्माण झाली आहे .ऐन सणासुदीत कळे पोलीस ठाण्याच्या अब्रुची लक्तरे वेशीवर आली आहेत.
कळे पोलीस ठाण्याचे यापूर्वीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी तीन वर्षे यशस्वी कार्यभार सांभाळला. आपल्या कार्यकाळात त्यांनी काळात मटका, दारू, तीन पानी खेळ यावर करडी नजर ठेऊन अवैध व्यावसायिकांना ठेचून काढत अवैद्य धंदे बंद करण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे, तर गल्लीबोळात विकली जाणारी दारूदेखील छापेमारी करून जप्त केल्याने तीन वर्षात परिसरातून पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत होता.
मात्र, तीन महिन्यापूर्वी कळे पोलीस ठाण्यात नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून रणजित पाटील रूजू झाले आहेत. पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पाटीलकीचा धाक निर्माण करतील, अशी नागरिकांची धारणा होती. मात्र, तीन महिन्यांपासून अवैध धंद्यांचे बंद असलेले दरवाजे पुन्हा उघडले असल्याने अवैद्य धंदेवाल्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आणि नागरिकांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे.
कळे परिसरातील एका नवदुर्गेने पोलिसांच्या अगोदर मटका अड्ड्यावर छापा टाकून नवऱ्याला चपलाने मारल्याने खळबळ उडाली असून या घटनेने कळे पोलीस ठाण्याची कार्यपद्धत चव्हाट्यावर आली आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कळे परिसरातील अवैद्य धंद्यांना पायबंद घालून कायद्याचा वचक निर्माण करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.