ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळूमामा भंडारा यात्रेची हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता ; पाच क्विंटल भंडाऱ्याची उधळण पारंपारिक वाद्यांचा गजर

मुदाळतिट्टा प्रतिनिधी :

श्रीक्षेत्र आदमापुर ता .भुदरगड येथील सद्गुरू बाळुमामा यांची वार्षिक भंडारा यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यात्रेनिमित्त दि. 30 रोजी श्री च्या पालखीची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पाच क्विंटल भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली. डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्यांचा गजर या पालखी सोहळ्यामध्ये करण्यात आला. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार न होता सुरळीत पार पडली. श्रींच्या मंदिरावर केलेली विद्युत रोषणा, फुलांनी केलेली सजावट व मंदिर परिसरात रेखाटलेल्या बाळूमामांच्या रांगोळी या वैशिष्ट्यपूर्ण होत्या .
22 मार्चपासून सुरू असलेला भंडारा यात्रेची सांगता झाली. यात्रा काळात हजारो भाविकांनी श्री चे दर्शन घेतले. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासन यंत्रणा अतिशय दक्ष होती. कोरोनाचे निर्बंध उठल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार हे लक्षात घेऊन बाळूमामा देवालय समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ व बाळू मामांचा भक्तगण यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजनयात्रेसाठी केले होते. यात्रे साठी आवश्यक असणारा पोलीस बंदोबस्त, पाण्याची सोय, आरोग्यासाठी आवश्यक असणारा दवाखाना, सार्वजनिक स्वच्छतागृह, यांची सोय करण्यात आली होती . महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान व अन्य राज्यातील आलेल्या भाविकांना कोणत्याही अडचणींना सामना करावा लागला नाही.श्री चे सुलभ दर्शन झाले यामुळे भाविक वर्गात समाधानाचे वातावरण दिसत होते
यात्रेच्या शेवटच्या दिवशी बाळुमामाच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ढोल कैताळाचा गगनभेदी आवाज, फटाक्यांची आतषबाजी, हालगी घुमक्याचा ताल, लेझीम, बँड अशी पारंपारिक वाद्य वापरत, डॉल्बीला फाटा देत पालखी मिरवणूक संपन्न झाली.हरी भजनात वारकरी बांधव दंगून गेले होते. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या जयघोषात सारा गाव दुमदुमून गेला होता. सकाळी आठ वाजता बाळूमामा मंदिर येथून प्रस्थान झालेली पालखी पाच वाजता मंदिरात स्थिरावली. पालखी मार्गावर सुमारे पाच क्विंटल भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली . हजारो भाविक भंडाऱ्यात रंगून गेले. संपूर्ण गावातील रस्ते भंडार्यामुळे माखुन गेले होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks