पूरबाधित भागातील विद्युत खाबांची उंची वाढविण्याबाबत सर्व्हे करा ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना

कोल्हापूर प्रतिनिधी :
पुरामुळे विद्युतपुरवठा खंडीत होऊन पाणी पुरवठा योजना बंद होऊ नयेत यासाठी पूरबाधित भागातील विद्युत खाबांची उंची वाढविण्यासाठी महावितरणने सर्व्हे करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिल्या.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे कबनूर ता. हातकणंगले गावाच्या जमिनी, लिंगनूर कसबा नूल ता. गडहिंग्लज येथील निवासी भूखंडावर मालकी हक्क नोंद होणे, शासन राज्य पत्रानुसार अतिरिक्त जमिनीचे भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 करणे आणि पूर बाधित भागात विद्युत पुरवठा सुरळीत राहण्याबाबत महसूल, महावितरण व संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपविभागीय अधिकारी सुशांतकिरण बनसोडे यांच्यासह युवराज पाटील, भैया माने उपस्थित होते.
पूर बाधित भागात विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा योजना बंद राहतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. पाणी पुरवठ्याबरोबच गावात विद्युत पुरवठा सुरळीत रहावा यासाठी, यापुढे पूर बाधित भागातील विद्युत वाहिन्यातारांची उंची वाढविणे गरजेचे आहे. खाबांची उंची वाढविण्याबरोबच ट्रान्सफार्मरही (डीपी) उंचीवर बसविण्यात यावेत. जेणेकरुन पूरबाधित गावात विद्युत पुरवठा सुरळीत राहील. विद्युत खाबांची उंची वाढविण्यासाठी लागणारा निधी महावितरणने त्यांच्या देखभाल दुरुस्तीतून करावा. या कामाकसाठी जादा निधी आवश्यक असल्यास याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावा, अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. यावेळी कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी, व्हन्नूर, पिंपळगाव, करनूर, वदूंर, कसबा सांगाव, मौजे सांगाव आणि सुळकुड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कबनूर येथील जमिनी वर्ग एक करण्याबाबत महसूल विभागाने पंधरा दिवसात निर्णय घ्यावा, लिंगनूर कसबा नूल ता. गडहिंग्लज येथील निवासी भूखंडावर मालकी हक्क लावण्याबाबत निर्णय घेण्यासाठी येथील रहिवाशांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे महसूल विभागास सादर करावीत, अशा सूचना करुन ग्रामविकास मंत्री म्हणाले, भूमिहीन व माजी सैनिकांना दिलेल्या जमिनीबाबतही संबंधित विभागाने तातडीने निर्णय घ्यावेत.
यावेळी ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पूरग्रस्तांना देण्यात येत असलेले सानुग्रह अनुदान, नुकसानीचे पंचनामे याबाबतही माहिती घेतली.