श्री. आनंदराव आबिटकर महाविद्यालय येथे रानभाज्या महोत्सवाचे यशस्वी आयोजन

निकाल न्यूज प्रतिनिधी :
पारंपरिक खाद्यसंस्कृतीला उजाळा देत, आनंदराव आबिटकर महाविद्यालय, कडगाव येथे नुकताच रानभाज्या महोत्सव उत्साहात पार पडला. रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि त्यांचे मानवी आरोग्यासाठी असलेले फायदे याबद्दल जनजागृती करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.
विक्रमसिंह आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. “कोल्हापूरसारख्या मोठ्या बाजारपेठेत विपणनाचे दार उघडा. योग्य नियोजन आणि सादरीकरण केल्यास या क्षेत्रात अपार संधी आणि मोठा नफा मिळू शकतो”. रानभाजींचे पोषणमूल्य, आरोग्य फायदे आणि पारंपरिक जतनाचे महत्त्व सांगत प्रमुख वक्ते एस.व्ही. ऍग्रोचे डॉ. शांतीकुमार पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या महोत्सवात पंचक्रोशीतील अनेक गावांमधून विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी आणलेल्या भाज्यांमध्ये कुरडू, शेंडवेल, शेवगा, टाकळा, भारंगी, आंबाडी, हादगा, गुणगुणा, माठ, करटोली, पात्री, गोमटी यांसारख्या अनेक दुर्मिळ रानभाज्यांचा समावेश होता.
यावेळी प्रा. वीरसिंह माने व प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला श्री आनंदराव आबिटकर कृषी महाविद्यालय, पाल येथील विद्यार्थी व प्राध्यापक तसेच श्री आनंदराव आबिटकर इंग्लिश मेडीयम स्कूल, गारगोटी येथील विद्यार्थी व शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांनी रानभाज्यांच्या स्टॉल्सना भेट देऊन माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी स्वतः रानभाज्यांचे विविध पदार्थ बनवून आणले होते आणि त्याबद्दल माहिती दिली. यामुळे या दोन्ही संस्थांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना रानभाज्यांविषयी अधिक माहिती मिळाली.
या महोत्सवामुळे एकीकडे पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन झाले, तर दुसरीकडे आरोग्यविषयक जनजागृतीही झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षाराणी साळोखे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. सायली दबडे यांनी मानले. या यशस्वी आयोजनामुळे रानभाज्या आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीबद्दल जागृती निर्माण झाली.