महापौर करण्यासाठी नगरसेवकांना 35 लाख दिल्याचे वक्तव्य: ‘आप’ची आ.कोरे यांच्याविरोधात लाचलुचपतकडे तक्रार

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
महापालिकेत जनसुराज्य पक्षाचा महापौर करण्यासाठी निवडून आलेल्या नगरसेवकांना 35-35 लाख रुपये दिले असा गौप्यस्फोट आ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. अशाप्रकारे नगरसेवकांना 35-35 लाख रुपये देऊन महापौर करणे हे चूक होते अशी कबुली त्यांनी यानिमित्ताने दिली. या घोडेबाजाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी तक्रार ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच वडगाव पोलीस ठाण्यात दिल्याची माहिती पन्हाळा तालुका अध्यक्ष शरद पाटील यांनी दिली.
ज्या नगरसेवकांना पैसे दिले अशांची यादी येणाऱ्या दोन दिवसात आ. कोरेंनी जनतेसमोर आणावी असे आवाहन ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी आ. विनय कोरेंना केले होते. परंतु यावर प्रतिक्रिया न दिल्यामुळे अखेर आ. कोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची त्यावेळी आ. कोरे यांच्यासोबत युती होती. नगरसेवकांना पैसे दिले असतील तर त्याबद्दल मला माहिती नाही, मी त्यावेळी उपस्थित नव्हतो असे वक्तव्य ना. मुश्रीफ यांनी केले. आ. कोरे यांच्या वक्तव्याचा विपर्यास कोणी करू नये असेही ते म्हणाले. परंतु राजकारणाचे पावित्र्य व कोल्हापूरची अस्मिता राखण्यासाठी ना. मुश्रीफ यांनी यावर साळसूतपणाची भूमिका न घेता आ. कोरेंना संबंधित नगरसेवकांची नावे उघड करण्यास सांगावे करावे असे आवाहन देसाई यांनी केले.
वर्चस्वाच्या राजकारणामुळे घोडेबाजाराला महापालिकेत ऊत आले. गेल्या 20 वर्षांमध्ये घोडेबाजाराच्या अनेक घटना महापालिकेत घडल्या. आ. कोरेंच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत महाविकास आघाडीच्या सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करावी. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या वक्तव्यावर चर्चा होऊन घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी भूमिका जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर यांनी मांडली.
यावेळी पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा अध्यक्ष शरद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात काणेकर, बाळासो जाधव, युवाध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, मयूर भोसले, इम्रान सरगुर, बसवराज हदीमनी उपस्थित होते.