ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

राज्य सरकार गेंड्याच्या कातडीचे : युवराज येडूरे; भुदरगड तहसिलदार कार्यालयावर मनसेचा आक्रोश मोर्चा

गारगोटी प्रतिनिधी :

राज्य सरकार गेंड्याच्या कातडीचे असून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम होत आहे. ही बाब गंभीर आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय मनसे सहन करणार नाही, असा इशारा मनसेचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे यांनी आज दिला.

एसटी महामंडळाचे राज्यशासनामध्ये विलिनिकरण व्हावे, या मागणीसाठी सोमवारी भुदरगड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तहसिलदार कार्यालय, गारगोटी आगार स्थानकावर आक्रोश मोर्चा काढून मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी युवराज येडूरे बोलत होते. एसटी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा देत एसटी महामंडळाचे कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह आंदोलनात सहभागी झाले होते. यात शाळा, कालेजमधील युवक-युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

युवराज येडूरे म्हणाले, राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्याची काळजी नाही. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सत्तेत नसताना एसटी कर्मचाऱ्यांचे आपण कैवारी असल्याचे भासविणारी शिवसेना आज सत्तेत आल्यावर दुटप्पीपणा करत आहे. सत्तेचा उपभोग घेणाऱ्या सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताची पर्वा नाही. एसटी महामंडळात भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. त्यामुळे एसटी तोट्यात आहे. कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबाची सरकारला काळजी असती तर सरकारने विलंब लावला नसता. दुर्गम भागातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी एसटी सेवा हीच आशेचा किरण आहे. मात्र सरकारच्या चुकीच्या भूमिकेमुळे विद्यार्थी वर्गासही रस्त्यावर यावे लागत आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील.

मनसेतर्फे राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गारगोटी येथे आक्रोश आंदोलनाचे आयोजन राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते तथा मनसेचे जनहित कक्ष विधी विभागाचे राज्य उपाध्यक्ष युवराज येडूरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) धनंजय देसाई, जिल्हा सचिव महेश देसाई, भुदरगड तालुका अध्यक्ष विक्रम आरडे, उपाध्यक्ष सुभाष रेपे, काशिनाथ लोहार, गारगोटी शहराध्यक्ष संदीप शिंदे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, प्रकाश पाटील, मारुती केसरकर, सूरज सावंत, चंद्रकांत येसादे, दयानंद सुतार उपस्थित होते.

यावेळी जिल्हा सचिव महेश देसाई, धनंजय देसाई, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी शशिकांत कुंभार, संतोष शिंदे, विजय शिंदे यांनी भाषण केले.

महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या भूमिकेमुळे आज आमच्या पालकांना व आम्हाला देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. आम्ही शिकायचे की रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे. हे सरकारने सांगावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सर्वसामान्य गरीब, दिव्यांग प्रवाश्यांचे हाल होत आहेत. खेड्यापाड्यात संपर्काचे माध्यम म्हणून एसटीकडे पाहिले जाते. ही लालपरी आमच्यासाठी वरदान आहे. तिचे अस्तित्वच जर संपुष्टात आले तर आमचे भविष्य अंधारमय होईल, असे मत एसटी कर्मचाऱ्याची मुलगी वृशाली सुरेश तेलंग हिने व्यक्त केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks