नियमित एसटी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर एसटी रोको आंदोलन स्थगित

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सुरुपली, ता. कागल येथे नियमित एसटी वाहतुकीसाठी विद्यार्थी व पालकांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. ग्रामीण भागातून शाळा आणि महाविद्यालयांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक मार्गांवर ये-जा करण्यासाठी एसटी बसची अद्यापही सोय नाही. त्यामुळे पुन्हा विद्यार्थी व पालकांनी आक्रमक होत सुरुपली येथे एसटी रोको आंदोलन केले. नियमित एसटी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर एसटी रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.
आंदोलनस्थळी राधानगरी आगारप्रमुख सागर पाटील, कागलच्या रूपाली ढेरे व गारगोटीचे प्रभारी आगारप्रमुख अनिकेत चौगले आल्यावर आंदोलनकर्त्यांनी घेराओ घालून त्यांना धारेवर धरले. शिवराज कॉलेज मुरगूडचे उपप्राचार्य रवींद्र शिंदे, प्रा. सुनील डेळेकर, प्रा. प्रशांत धायगुडे, प्रा. रोहन पाटील व प्रा. अशोक सुतार यांनी यशस्वी शिष्टाई करत विद्यार्थ्यांसाठी निपाणी-मुरगूड, म्हाकवे- मुरगूड व इतर काही मार्गांवर नियमित एसटी बसेस सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.