विशेष लेख : सर्वसामान्यांची हक्काची एसटी वाचली पाहिजे, एसटी वाढली पाहिजे.
भारतासारख्या अति लोकसंख्या असलेल्या अप्रगत देशात सार्वजनिक प्रवास व्यवस्था ही जास्तीत जास्त सक्षम करणं ही सर्वात प्राधान्याची बाब असायला हवी.

शब्दांकन : डॉ. अर्जुन कुंभार
एसटी ही राज्यातील तुम्हा आम्हा सर्वांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनाचा प्रदीर्घ काळाचा ऋणानुबंध आणि जिव्हाळा आहे.
एसटी म्हणजेच स्वस्त सार्वजनिक प्रवाशी वाहतूक.
गोरगरीब, सर्वसामान्य लोकांना परवडणारी, राज्यभर सुरक्षित विद्यार्थी वाहतूक करणारी, सर्वत्र- सर्वदूर पोहचणारी हक्काची वाहतूक, एक सुरक्षित प्रवास!
एकविसाव्या शतकामध्ये प्रचंड जंगल तोड आणि प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या जागतिक तापमानात खाजगी वाहतुकीचा मोठा वाटा आहे. वेगाने वाढणारा नवश्रीमंत वर्ग आणि त्यांच्या बदलणाऱ्या प्रतिष्ठेच्या कल्पना यामुळे ऑटोमोबाइल इंडस्ट्रीने राज्यकर्त्यांच्या पाठबळामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी मोटार गाड्यांचे उत्पादन सुरू केले असून याचा परिणाम म्हणून आपण प्रदूषणाचे प्रमाण तर प्रचंड वाढवत आहोतच, त्याच बरोबर रस्त्यांवरील वाढलेले अपघात, शहरांमधील वाहन पार्किंगचा उडालेला बोजवारा यातून छोट्या-मोठ्या शहरांचे जनजीवन अत्यंत असुरक्षित आणि दर्जाहीन बनत चालले आहे.
त्यात शासनाच्या एसटी सारख्या सक्षम प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यवस्थेबाबतीतची अनास्था आणि खाजगी वाहतुकीस दिले जाणारे प्रोत्साहन आणि पाठबळ पाहता ही व्यवस्था पूर्णपणे अडचणीत येत असून त्याचा देशाच्या सार्वजनिक जीवनावर, पर्यावरणावर आणि एसटी मध्ये तुटपुंज्या पगारावर काम करत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहेत.
सर्व प्रगत देशांमध्ये एकूण सर्वसामान्य जनतेच्या सुखदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी, त्याच बरोबर पर्यावरण रक्षण आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम केली जात असल्याचे दिसते.
भारतासारख्या अति लोकसंख्या असलेल्या अप्रगत देशात सार्वजनिक प्रवास व्यवस्था ही जास्तीत जास्त सक्षम करणं ही सर्वात प्राधान्याची बाब असायला हवी. यासाठी राज्यकर्ते आणि विरोधक या दोघांनीही मिळून जनतेच्या आणि देशाच्या हितासाठी ही सार्वजनिक प्रवाशी वाहतूक व्यवस्था दर्जेदार, सुरळीत आणि सक्षम बनविण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याची गरज आहे.
सार्वजनिक सेवांचे खाजगीकरण झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे शोषण कशा पद्धतीने होते याची शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत.
ही व्यवस्था सक्षम का होत नाही याची चिकित्सा होण्याची गरज आहे. यातील होणारा भ्रष्टाचार आणि कार्यरत असलेले असक्षम व्यवस्थापन यावर तात्काळ उपाययोजना करायला हव्यात. यासाठी एसटीचे कायम स्वरूपी सक्षमीकरण करून एसटीच्या अभावी होणारे सर्व अनर्थ टाळावेत अशी आम्ही विद्यमान शासनास कळकळीची विनंती करत आहोत.
…………………………………………………
डॉ. अर्जुन कुंभार.
शाश्वत विकास चळवळ, गारगोटी कोल्हापूर
