ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशेष लेख :    | जरा याद करो कुरबानी | चिखली च्या हुतात्मा हरिबा बेनाडे यांचा चित्तथरारक स्वातंत्र्यलढा .

शब्दांकन : व्ही.आर.भोसले 

दिनांक ७ एप्रिल १९४४ .सूर्यास्ताची वेळ .भारतीय स्वातंत्र्य लढयातील एक तेजस्वी तारा आकाशातील सूर्याबरोबरच अस्ताला गेला .
जातांना स्वातंत्र्यप्रेमाचा लालीमा आकाशात विखरून गेला .तो तारा म्हणजे

चिखली गावचा हुतात्मा हरिबा बेनाडे .

मुरगूड चे इतिहास अभ्यासक एम .डी .रावण यांनी हरिबा बेनाडे यांचा चित्तथरारक लढा सविस्तरपणे मांडला आहे .त्यांच्यामुळेच तो साऱ्या महाराष्ट्राला माहिती झाला .
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त या विराचे स्मरण करतांना उत्स्फूर्तपणे लता दिदीच्या त्या अजरामर ओळीं ओठातून बाहेर पडतात .

जरा याद करो कुरबानी

हरिबा बेनाडे म्हणजे नानीबाई चिखली गावच्या तालमीत लाल मातीत तयार झालेला एक तगडा मल्ल .
स्वातंत्र्यलढ्याचे दंड हरिबांनी याच मातीतून ठोकायला सुरुवात केली .
द्रौपदीचे वस्त्रहरण पाहून भर दरबारात भिमानेही प्रतिज्ञा केली होती .

“दुर्योधना द्रौपदीच्या विनयभंगाचा बदला मी तुझी मांडी फोडूनच घेइन “
हरिबा यांचे व्यक्तीमत्व भिमासारखे च होते .
साडे सहा फूट उंची .२५० पौंड वजन ,करारी चेहरा आणि भेदक नजर आणि हृदयात ब्रिटिश सत्तेविरुद्ध पेटलेली आग .

कोण ब्रिटिश ?

साता समुद्रा पलीकडून आलेल्या या गोऱ्या माकडांनी येथे येऊन हैदोस घातलाय .कोणाच्या जोरावर .
इथल्या आमच्याच काळ्या पोलिसांच्या जोरावर .सैन्याला मरायला महायुद्धात पाठवले आणि पोलिसांच्या हाती लाठ्या देऊन आपल्याच देशबांधवांना बडवायला सांगितले .

गांधीजींची चलेजावची चळवळ एखादया नशे प्रमाणे देशभक्तांच्या रक्तात भिनली होती .
हरिबा त्याला अपवाद नव्हते .
त्यांनी कागल ,भुदरगड राधानगरी पेठे व म्हैसूर प्रांतातील कांही गावच्या स्वातंत्र्यवेड्या तरुणांची फळीच तयार केली .त्यांच्या हातात दांडकी दिली आणि पोलिसां मिळेल तिथे झोडपायला सुरुवात केली .मार असा की त्याचे वर्णन त्या वेळी एका शब्दात केले जायचे .

‘ हग्या मार ‘

हरिबा सेनेच्या या भीतीने कांही देशी पोलिसांनी नोकऱ्या सोडून घरी बसणे पसंत केले .
हरिबा बेनाडे यांचे मुख्य लक्ष्य होते .मुरगूडच्या पोलिस ठाण्याचा फौजदार चिकोडीकर आणि गोरगोटी कचेरीतील पोलिस बाबू जाधव .

या दोघांना ठार केल्याशिवाय हरिबा ना चैन पडणार नव्हती .
,चिकोडीकर सतत भूमिगत देशभक्तांच्या मागावर असायचा व त्यांच्या बातम्या ब्रिटिशांना पुरवायचा .
बाबू जाधव ने १३ .१२.४२ रोजी कचेरी वर हल्ला केलेल्या सहा देशभक्तावर अमानुष गोळ्या झाडल्या होत्या .हो आपल्याच देशबांधवावर . ब्रिटिशांचे तळवे चालणाऱ्या देशी गद्दाराने भारतमातेच्या लेकरांचा बळी घेतला होता .
मुरगुडच्या पाटणकर वाड्यात हा कट शिजला होता .
कांही घरभेद्या मुळे तो यशस्वी झाला नाही याची टोचणी हरिबांच्या मनाला लागली होती .
त्यांनी मोहीम थांबवली नाही .बार्शी रेल्वेतील टपाल हल्ला त्यांनी यशस्वी केला .देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी त्यांना शाबासकी दिली होती .
पोलिस चीफ निंबाळकर बिथरले होते .त्यांनी हरिबा बेनाडे यांना पकडण्या करिता प्रत्येकी पन्नास पोलिसांच्या १४ तुकड्या म्हणजे ७०० पोलिस वरिष्ठांकडून मागवले .
जागोजागी तुकड्या दाखल झाल्या .

सिंहाच्या शिकारीला लांडग्यांच्या फौजा .
,हरिबा अजिबात डगमगले नाहीत .उलट सावध होऊन प्रतिहल्ला करायचे त्यांनी ठरवले .

डी एस पी राणे वर हल्ला.
—————————– –

हरिबा बेनाडे नी तरुणांना गोळा केले व भिवशी गाठली .डी .एस.पी.राणे पोलिस फौज फाटा घेऊन पट्टकोंडोलीच्या चावडीत मुक्कामाला होता .चावडीच्या वरच्या मजल्यावर एका खोलीत तो झोपला होता .रात्रीची वेळ .भाले, दांडकी व दोऱ्या घेऊन हरिबांची सेना निघाली .

मावळ्यांनी शिवरायांच्या नेतृत्वाखाली लाल महालात राहिलेल्या शाहिस्तेखानावर हल्ला केला होता त्या इतिहासाची आठवण व्हावी असाच तो प्रसंग .
हरिबांच्या त्या मावळ्यांनी चावडीवर हल्ला चढवला .अचानकपणे झालेल्या हल्ल्याने पोलिसांची पाचावर धारण बसली .बंदुका सावरायलाही त्यांना वेळ मिळाला नाही .निधड्या छातीच्या पोरांनी पोलिसांच्या बंदुका भराभर काढून घेतल्या .बरोबर आणलेल्या दोऱ्यानी त्यांना खुर्च्यांवर बांधून घातले .

हरिबा गरजले .
“देशद्रोह्यांनो खरं तर तुम्हीं मरायलाच पाहिजे .तुम्हीं गुलाम आहात .भाकरी साठी विदेशी लोकांची चाकरी करता . आमचेच देशबांधव म्हणून जीवदान देतो .पण त्या राण्याला सोडणार नाही .
हरिबा जिन्यावरून धावत गेले .राणे तोवर जागा झाला होता .हरिबांच्या रूपाने साक्षात काळ समोर उभा ठाकला होता .डी.एस.पी.राणेची घाबरगुंडी उडाली .दरदरून घाम फुटला .त्याने कशीतरी खिडकीतूनच उडी मारली व पसार झाला .त्याने सरळ पळतच निपाणी गाठली .

डी.एस.पी.पळताना पाहून पोलिस सावध झाले .शिट्या वाजू लागल्या .तुकड्या गोळा होऊ लागल्या .पिस्तुल टाकून पळालेल्या राणेला जरा धीर आला असावा .
त्याने मोर्चे घेतलेल्या हरिबांच्या मावळ्यांना घेरले .एका खोल घळीत हरिबा आपली बंदूक धरून बसले होते .
उसने अवसान आणून राणे म्हणाला
“बेनाडे ,शरण ये ,तुला आम्हीं जिवंत पकडू ,ठार मारत नाही .”

तो स्वातंत्र्य सिंह तेथूनच गरजला .
“अरे जा ,लांडग्या ,तू तर भेकड ,भिकारी तू काय मला जीवदान देणार .? मायभूमीसाठी मी मरायलाही तयार आहे .

सूर्य मावळत चालला होता .बंदुकीची नळी रोखून बसलेला हा दुसरा सूर्य कधि अस्ताला गेला ते पोलिसांनाही कळले नाही .दोन दिवस त्या घळीकडे फिरकायचे ही धाडस पोलिसांना झाले नाही .डी.एस.पी .राणेला सुद्धा वाटले असेल मी उगीचच सूर्याला मिणमिणता दिवा दाखवत होतो .
त्याला त्याच्या भेकडपणाची लाज वाटली असेल . गणवेष चढवलेल्या पोलिसांना ही वाटले असेल आम्हीं तर पाळलेली मेंढरं ,खरा सिंह हरिबा बेनाडेच .

जय भारत

शब्दांकन : व्ही. आर.भोसले 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks