ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशेष लेख : कोणी घर देतां का घर ??

शब्दांकन : व्ही. आर.भोसले (मुरगुड)

वि .वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकातील गणपतराव बेलवलकर यांचे एक वाक्य फार गाजले .

“कोणी घर देता का घर ?”

या वाक्याची तंतोतंत आठवण महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रांनी करून दिली .

दिवाळी नाही,दसरा नाही ,विधानसभा निवडणूक नाही,आणि अचानक उद्धव ठाकरेंनी घोषणा केली  

“प्रत्येक आमदाराला सरकार घर देणार .”

घोषणा ऐकून गणपतरावांची खुप आठवण झाली .ते नटसम्राट होते ,कीर्ती संपन्न होते ,नाट्यरसीकांच्या हृदयात त्यांनी घर केलं होतं पण त्यांना स्वतःला रहायला घर नव्हते .त्यांच्या मुलांनी त्यांना बेघर केलं होतं .मुलीने आसरा दिला होता पण तिथंही त्यांच्यावर चोरीचा आळ आला .

एवढा मोठा नट पण अन्न आणि घर यासाठी वणवण करायची वेळ त्यांचेवर आली .
त्यावेळी ही घोषणा झाली असती तर एखाद्या नाट्यवेड्या आमदाराने त्यांना आपल्या घरात जागा दिली असती .

तात्पर्य काय ज्यांना खरोखर घराची गरज आहे त्यांना उद्धव सरकारने घरे दिली असती तर त्या गरिबांनी हत्ती भाड्याने घेऊन त्यावरून त्यांच्या नावे साखर वाटली असती .

मराठवाडा ,विदर्भातल्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या पश्चिम महाराष्ट्रात येतात .सहा महिने शेतात फाटक्या तंबूत रहातात .पाण्याची आणि प्रातर्विधीची सोय नाही ,सरपटणारे प्राणी तंबूत कधि शिरतील याचा नेम नाही ,कंत्राटदारांची वाकडी नजर महिलांच्या उघड्या अंगावर पडून कधि ‘आक्रीत ‘ ओढवेल सांगता येत नाही .वीतभर पोटासाठी सगळं कुटुंब पाठीवर घेऊन रानोरान फिरणाऱ्या या गरीबांना घरासाठी कोणी विचारलंय का ?

झोपडपट्टीत राहून दुसऱ्यांची आलिशान घरे उभी करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी ‘”तुमच्या घराचं काय”असं आपुलकीनं कधि कोण्या आमदाराने विचारलंय काय ?

आझाद मैदानात उन्हा पावसात राहून पुरेशा पगारासाठी तीन महिने आंदोलन करणाऱ्या एस, टी कामगारांना तुम्हांला घरासाठी कर्ज तरी मिळतंय का ?असं कोणी विचारलंय का ?
कर्जापायी घर दार गमावलेल्या हजारो शेतकऱ्यांनी झाडाला टांगून घेऊन आत्महत्या केल्या त्यांना जरी थोडी मदत केली असती तर उद्धव सरकारचं कौतुक झालं असतं .
‘”हिंमत असेल तर समोर या ,आम्हीं मर्द आहोत ,वाघ आहोत,”अशा पोकळ बतावण्या करणाऱ्या करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी निदान अन्नदात्या शेतकऱ्यांच्या करिता एखादी घोषणा केली असती तर त्यांनी पाडवा नसतानाही गुढ्या उभ्या केल्या असत्या .
आमदार गरीब असतात ,त्यांना रहायला घर नसतं .म्हणून त्यांना घर द्यायचं .हा विषय खरं तर संशोधनाचाच म्हणावा लागेल .
निवडणुकीला कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या आमदाराला खरंच घर नसेल का राहायला ?
शिवशाही बसेस विकत घेऊन एस टी महामंडळास भाड्याने देणारे आमदार काय बिन घराचे असतील ?

ईडी ने जिथे जिथे छापे टाकले त्या आमदारांच्या काय चंद्रमौळी झोपड्या होत्या ?

राजकारणातील घरणेशाही पाहिली की एकेका घराण्यात दोन दोन ,तीन तीन घरे वाटणी ला येतील .
एकेका आमदारांच्या वसाहती आहेत ,उद्योग धंदे आहेत ,कारखाने आहेत ,त्यांना कशाला घरे .?
आमदार निवडून येतात ते जनतेच्या सेवे साठी .सरकारातील जनतेचे प्रतिनिधी म्हणजे आमदार हे उद्धवजी ना माहीत नाही का?

भाजपाचे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांना घर नाही म्हणून ‘पीएनजी ‘चालवतात का ? चंद्रकांत दादा पाटील काय भाड्याच्या घरात रहातात ?

अजित दादा कुठल्या घरात रहातात हेच शोधण्यात वर्ष निघून जाईल .
बांद्रा येथील मातोश्री काय बेवारस घर आहे का ,?
आमदारांनी तरी का अपेक्षा करावी ? तशी त्यांनी ती केली तर मतदारांना काय सांगणार .?
“या साठीच केला होता अट्टाहास ” असं तर सांगणार नाही ना ?

सांगोला चे आमदार गणपतराव देशमुख पन्नास वर्षे सलग निवडून येत होते .अधिवेशनाला ही ते एस टी च्या लाल डब्ब्यातुन जायचे ,.

ते असते तर त्यांनी खडसावून सरकारला बजावलं असतं “सरकारचा खजिना हा कोणा एका व्यक्तीच्या मालकीचा नाही ,तमाम जनतेचा त्यावर हक्क आहे .त्याची उधळपट्टी करू नका .
एन ,डी ,.पाटील हे शरद पवारांचे मेहुणे .त्यांनी शेवटच्या श्वासा पर्यंत तत्वांशी तडजोड केली नाही .एखाद्या आंदोलनाचा फतवा घेऊन ते मंत्रालयात जायचे तेव्हा मुख्यमंत्री सुद्धा त्यांना पहाताच उठून उभे रहायचे .
हा सन्मान सिमेंटच्या हवेलीत राहून मिळत नाहीं .लोकांच्या हृदयात राहून मिळतो .
उद्धव सरकारची ही घोषणा ऐकून ‘साधी माणसं ‘या गाजलेल्या चित्रपटातील गीत आठवतं

“उद्धवा अजब तुझे सरकार .
पतिव्रते च्या गळ्यात धोंडा
वेशेला माणिहार ||

शब्दांकन : व्ही. आर.भोसले (मुरगुड)

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks