जीवनमंत्रताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

चंदगडी बोलीत संजय साबळे यांचा विशेष लेख…”म्हाळ आणि मोबाईल”

‘व्हई व्हंजी उदये आमच्यात एकवात राव्हा की जोडी ‘
देसायाची साईत्री दारातनच हाऊळ घालीत आली.
‘ काय सांगो माझ्या गोदू सकाळच्यानं चौघ सांगोन गेल्यात. कुणास शबद दिऊस नाय.आमचा घोमाणुस खरा नाय. तुला यतो म्हणील आणि कुठे जाईल सांगोस गावन नाय. ‘ द्रुपती चुलीत लाकडं ढकलीत म्हटली.

‘ व्हयं व्हंजी खरं हाय तुझं . सगळं गाव फिरलो. सगळ्यास्न आधीच सांगोन ठवल्यानीत .तुम्ही इनइवाय झाल्याशीत म्हणून तुमचा जोडा एकवात म्हणून ठेवूचा लागताय. ‘ साईत्रीनं आपला नाईलाज व्यक्त केला.

‘ आमचा माणूस कुठे दारू पिवोन पडताय कुणास ठाऊक. मागच्या वर्षी नाऱ्या भावोजीनं घरातनं उचलून नेल्यानं पाय धुवून बसवून चार घास चारी वल्यानं. एकवातकार म्हटल्यावर सगळं करूचं लागतायं.गावात तुमची भावकी मोठी आणि आमची चार घरं. कोण कुणास गावतलं एकवात. आमच्या थोरल्या पोरीस धुमडेवाडीत दिल्ल हाय. त्यांच्या गावात बी असाच वणवा. सगळं गाव पाटलांच.कोण कुणास एकवात राहतलं. ‘ द्रुपती तव्यावर भाकरी टाकीत बोलली.

‘ आमच्या मधला सासरा वाट लागला. म्हणून आमचे यंद अनसुठ म्हाळ. तेचं काय मरतलं वय. सून पोटासंच काय घालीनसे. कवं एकद मरताय म्हातारा असं म्हणी रांड. शिकली नी हाय म्हणी. म्हातारा ऊठाउठी मेला. ‘ साईत्री पोटातलं ओठावर आलं.

‘ व्हयं गं त्या तिकूडच्या भागातल्या उंडग्या तशाच असतात बाई. माणूसकीचा धरम नाय बोडक्यासन. हयेंचे बी आई बाबा असतील नी !

मागच्या पुनवेस सासवेस गिळोन घेतलीन आणि आत्त सासऱ्यास. झाली एकद मोकळी माझी सवत कुठली ‘. द्रुपती आपल्या सूना ऐकोंदेत म्हणून मोठ्याने बोलोली.

‘वसाड पडोंदेत घे ते दुसऱ्यांच कशास बोलोया. सगळ्यांच तेच घे. म्हाळास एकवात रातीसाय काय नाय ते सांग. सकाळी त्वांड धूतल्यानं ते बेळेभाटाचे दोन जोडे सांगोन आलाय आमचा घोमाणूस. मासे असतात आमच्या म्हाळास. आमचा म्हातारा माश्यास दांडगा वंडा व्हता. नदीची कोंडकं पडली की चिंगळ्या बी धरून आणि फाटक्या मच्छरदानीतनं. ‘साईत्री मेलेल्या म्हाताऱ्याच कौतुक करूली.

व्हय ही रांड नी खरी .जीता असतानं कधी माशाचं पाणी दाखवूस नाय म्हाताऱ्यास. द्रुपती मनातच म्हणली.

मास्याचं नाव ऐकताच मगापासून मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेलं तान्याचं प्वारं बोललं
‘ म्हाताऱ्या आई मीया बी येणारं म्हाळास. मिया काटया सकाटचं मासे खातोय. कुरूम कुरुम. ‘

‘,व्हय बंदया तू नुसतं खाऊन खाऊन गायरेची भर कर. काम नाय धंदा उटलं सुटलं मोबाईल घेऊन बसतायं माझा चोथ्था. ‘ द्रुपती मारूत्यावर चवताळली.

‘ए खेबडी तुला काय कळताय मोबाईलातलं. अगं आमचा ऑनलाईन अभ्यास चालू असताय. आमचे सर न चुकता दररोज एक व्हिडोओ पाठूतात. तो बघूचाच लागताय. ‘ मारूत्यान मोबाईल बघायचं समर्थन केलं .

‘कवतरी हाय की. काय रातध्याड नुसता मोबाईल.
जेवतानं,हागतानं, मुततानं हयास मोबाईल लागताय. असला कधी अभ्यास असताय व्हयं. एकदं शाळा सुरू व्हईती म्हणजे बरं . व्हईत. ‘ द्रुपती रागानच बोलली.

साईत्री लगेच म्हटली
‘ व्हय व्हंजी आमच्या धाकट्याचं आणि एवढं खुट्टया एवढं हायं खरं मोबाईल दिलीस तरच तोंडात घास घेतायं.
माझ्या नंदेच प्वार.एब एवढं हाय. राणादा म्हणत्यात त्यास. दांडगं चाप्टर हाय.आगं बाई मोबाईल देल्याशिवाय हागोसच बसणं नाय. दोन दिवस जर मोबाईल नाय दिलीस तर हागोस च जाणं नाय.व्हय आमच्या थोरल्या जावेचा भाव साबळे मास्तर चंदगडास म्हास्तर हाय तो आऊस न्हगडे झालय म्हणून आल्ला घराकडे तो सांगोला. आत शाळा सुरू झाल्यात. पोरास्न मोबाईल तेवढं देऊ नकाशी. पोरं एक येळ शाळा नाय शिकली तरी चालतील. दांडग येसनं लागलंय पोरास्न मोबाईलचं. पोरं आणि पोरया नको नको ते बघुल्यात. आणि पिसावल्यात करूल्यात.
कुठल्या वर्गात हाय ते बी पोरास्न कळेना.’

‘काय गं बाई त्या राणादाचं व्हईक. आतपासून प्वारं मोबाईलसाठी असं करूलं तर कसं गं होणारं? आमच्या येळेस मोबाईल नव्हते ते बरं होतं बाई. ‘ द्रुपती मनातलं बोलली .

‘व्हय ई एकदं सवय झाली की सुटनं नाय बघ. आमचा मधला तुक्याचा बाबा करक लावल्याशिवाय त्याला हागोस चं व्हनं नाय बघं.
मागेलेंदी पोरीकडे मंमईस गेल्ला. तिथे कुठली करक आणि शानी आठ दिवस हागोस व्हईना. प्वाट फुगोन सामडूम झालं. डॉक्टर पानी करी सकोळ पुरे झालं. गावाकडे जा म्हणून पाठून दिलीन पोरीनं. असली बाई खबर त्येची ‘. सात्रीने सवय लवकर मोडत नाय यावर उदाहरणासह स्पष्टीकरण दिलीनं.

एवढयात साईत्रीचा घोमाणूस राम्या तीला शोधीत आला.
‘ तुझ्या बाईस तुझ्या , उठली साय ते तीया इथे गजालीस येऊन बसली साय. मला सांगटलीस एकवात सांगतो म्हणून. घरात पोरांनी एका मोबाईलवरनं डोचकं फोडून घेतल्यानीत. रांडेच ते थोरल्या आप्पाचं प्वार दांडग हुंब. हातास काय गावेल तेनं मारतायं. ते वसाड पडोंदेत एकवातकार पयलं त्या म्हादयाच्या पोरासं गोडार्डाकडे घेऊन जा. ‘

‘खरं भावोजी घरात कोण नव्हतं. त्येंच्या आया कुठे गेल्ल्या. ‘ द्रुपतीनं शंका इचारली.
‘ काय सांगो व्हन्नी , थोरला पुढारपान करूस गेला.उठलाय तो जानबाच्या पोरीची तीराईत करूस गेलाय. खालच्या गल्लीच्या नाम्यानं रात्री बारा वाजता त्या पोरीस फोन केल्यान म्हणी. धाकटा मसरं घेऊन टेकावर गेला. थोरलीचे माहेरचे म्हाळ म्हणून ती नारळ देऊस गेली. आणि धाकटी गोटा बळदूलय. ‘ राम्यानं सविस्तर द्रुपती व्हनीसं सांगितल्यानं.

व्हंजी आतं परत सांगोस येनं नाय. हेच सांगणं बघ . हणम्या भावोजी काय नाय म्हणूचा नाय. वरच्या गल्लीची राम्याची घोबायलं अल्ली म्हणून सांग. ‘

एवढेच्यान सांगोल्याशीत म्हाळचं येतो घे . पयल जा बाई आधी त्या पोराचं बघ जा.

पोरास डोचक्यात केवढं लागलयं काय की या विचारातच साईत्रीनं घरचा रस्ता जवळ केला.

शब्दांकन 

संजय गोपाळ साबळे
दि. न्यू इंग्लिश स्कूल,
चंदगड

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks