सोनाळी खून प्रकरण : विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांची सावर्डे घटनास्थळाला भेट; मुरगूड पोलीस स्टेशनला भेट : तपासाचा दर्जा चांगला

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनाळी ता- कागल येथील सात वर्षाच्या वरद रविंद्र पाटील याच्या खून प्रकरणी गुन्ह्याची कबुली दिलेल्या मारूती वैद्य यास अटक झाली . मात्र अद्याप खुनाच्या कारणाचा उलगडा करण्यात पोलिस प्रशासनाला यश आलेले नाही . या प्रकरणी मोर्च, निषेध, कँडल मार्च, नेत्यांच्या भेटी यामुळे सोनाळीत तणावपूर्ण शांतता आहे . या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी सावर्डे येथील घटनास्थळाला भेट दिली . तसेच मुरगूड पोलिस स्टेशनला भेट देवून गुन्ह्याची , तपासाची माहीती घेतली .
सोनाळी येथील कु . वरद रविंद्र पाटील याचे दि-१७ ऑगस्ट रोजी सावर्डे बु .येथुन अपहरण झाले होते . याचा छडा लावणं पोलिसासमोर आव्हान होतं . मात्र मुरगूड पोलिसांनी केवळ ४८ तासात याचा छडा लावत अपहरण नाटयाचा पर्दापाश केला . या प्रकरणी दत्तात्रय उर्फ मारूती वैद्य याला ताब्यात घेवुन पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली देत दि-१८ रोजी सावर्डे येथे खून केलेल्या वरदचा मृतदेह दाखविला होता.
निष्पाप वरदचा अमानुषपणे खून झाल्यामुळे सोनाळी व सावर्डे बु .येथील ग्रामस्थात संतापाची लाट पसरली . या दोन्ही गावातुन दोन हजारावर लोकांनी मुरगूड पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला . खुन्यास फाशी देण्याची मागणी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, अॅड . उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशा मागण्या करण्यात आल्या . आरोपीस दि-२६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे . मात्र आठवडा होत आता तरी अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही .
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी
आज सकाळी ११ : १५ वाजता मुरगूड पोलिस स्टेशनला भेट देवून गुन्ह्याची माहीती घेतली . गुन्ह्यातील कागदपत्रांची तपासणी करून ती व्यवस्थित असल्याचे सांगितले .आरोपी मारूती वैद्य याने दिलेली गुन्ह्याची कबुली, त्याने दाखवलेला मृतदेह व अन्य माहीती वरून त्याच्यावर गुन्हा सिद्ध होईल इतका पुरावा पोलिसाकडे आहे . तपासाचा दर्जा चांगला असल्याचे सांगितले . मात्र खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही .यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख तिरुपती काकडे, करवीर डीवायएसपी आर आर पाटील, सपोनि विकास बडवे उपस्थित होते.