रक्ताची नाती बिघडल्यास समाजाची अधोगती : इंद्रजित देशमुख ; शिंदेवाडी येथे शिवम प्रतिष्ठान तर्फे व्याख्यानाचे आयोजन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
समाजात आदर्श पिढी घडविण्याची ताकद आई-वडिलांमध्ये असते. आजच्या बदलत्या काळात मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. रक्ताची नाती बिघडली की समाजाची अधोगती होते. समाज घडविण्यासाठी संस्कारक्षम नवी पिढी तयार करणे आवश्यक आहे. आई-वडिलांच्या विचारांचा नव्या पिढीने आदर करावा, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.
शिंदेवाडी (ता. कागल ) येथे शिवम प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानात देशमुख बोलत होते.दीपप्रज्वलाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. टाळ मृदुगांच्या गजरात इंद्रजीत देखमुख (काकाजी) यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो वारकऱ्यांसह ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी देशमुख म्हणाले, मोबाईल, सोशल मीडिया आणि व्यसने यामध्ये आजची तरुण पिढी गुंतल्याने आदर्श जीवनाचा अर्थच गमावला आहे. सुशिक्षित मुलांकडून आई-वडिलांच्या सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याने वृद्धाश्रमांची संख्या बळावू लागली, ही शोकांतिका आहे. शालेय वयातच मुलांच्यावर चांगले संस्कार केले तर देश आदर्शवादी बनेल.ते म्हणाले, सुखी कुटुंबातच संस्काराची बीजे रोवली पाहिजेत. रक्ताची नाती सुधारली तर देशात सौख्य नांदेल. आई-वडिलांच्या विचारांचा आदर केल्याने घराला घरपण येईल. नव्या पिढीला संत विचारांची शिकवण देण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे.
यावेळी गावातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.शिवम प्रतिष्ठान मुरगूड व समस्त शिंदेवाडी ग्रामस्थ यांचेवतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे स्वागत सुशांत शिंदे, प्रास्ताविक डॉ. सुरेश खराडे यांनी तर सूत्रसंचालन आर.जी. पाटील यांनी केले.