मुरगूडसाठी ३३ केव्हीचे वीज केंद्र मंजूर

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड शहर व परिसरातील ५४ गावांतील औद्योगिक, व्यापारी शेती व घरगुती कारणासाठी लागणाऱ्या विजेची आवश्यकता लक्षात घेऊन मुरगूडला ३३ केव्हीचे वीज केंद्र मंजूर झाले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी दिली. खासदार संजय मंडलिक यांनी यांच्या पाठपुरावाला यश आल्याचे म्हटले आहे. मुरगूड शहर व परिसरातील ५४ गावे मुरगूड विभागात येतात. याअंतर्गत औद्योगिक, कृषी, व्यापारी व घरगुती क्षेत्रातील हजारो वीज ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांना आवश्यक वीजपुरवठा मुदाळतिट्टा सब स्टेशन किंवा मुम्मेवाडी सब स्टेशनकडून घ्यावा लागत होता. त्यात अनेकवेळा तांत्रिक अडचणी येऊन वीजपुरवठा होण्यात व्यत्यय येत होता, त्यामुळे मुरगूडला स्वतंत्र वीज केंद्र होण्याची गरज होती. ३३ केव्हीचे वीज केंद्र स्थापण्याचा वीज महावितरण कंपनी व ऊर्जा खात्याकडे प्रस्ताव प्रलंबित होता. खासदार मंडलिक यांनी याचा पाठपुरावा केल्याने या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी मिळाली. या वीज केंद्रासाठी मुरगूड शहरात जागा आरक्षित केली असून, या जागेचा व अन्य दोन ठिकाणच्या जागांचा सर्व्हे करण्यात आला आहे. जागा निश्चितीनंतर अंदाजे ४ कोटींच्या या प्रकल्पास सुरुवात होईल, असे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले. दरम्यान, मुरगूडला वीज केंद्राला तांत्रिक मंजुरीचे पत्र आजच मिळाले. याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.