कागल येथे श्रीराम नवमी उत्सव भक्तिमय वातावारणात साजरा ; श्रीराम मंदिरमधील विविध उपक्रमांस भक्तांचा उत्सफुर्त प्रतिसाद

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
श्रीराम मंदीर, कागल येथे चालू वर्षी “चैत्र गुढी पाडवा” ते ” श्रीराम नवमी” या पर्व काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून श्रीराम नवमी उत्त्सव भक्तिमय वातावारणात विविध उपक्रमांनी साजरा झाला.
आज प्रभू श्रीराम जयंती दिनी श्रीराम मंदिर येथे दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा विधिवत पार पडला. महिलांनी पाळणा गायन केले.तर विधिवत पूजा करण्यात आली. १०९ इन्फंट्री बटालियन टीए मराठा लाईट इन्फंट्रीचे कमाडींग आॕफिसर बी.के.कुल्लोली व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. श्रुती कुल्लोली या उभयतांच्या हस्ते महाआरती झाली.
महाआरती शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,राजे प्रविणसिंह घाटगे,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,राजे बँकेच्या चेअरमन सौ.नवोदितादेवी घाटगे,राजे विरेंद्रसिंह घाटगे,सौ.श्रेयादेवी घाटगे,युवराज आर्यवीर घाटगे,युवराज राघवेंद्रसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी उपस्थित हजारो श्रीराम भक्त भाविकांनी श्रीराम जय राम जय जय राम, जय श्री राम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.त्यामुळे वातावरण श्रीराममय झाले.आठवडाभर संतश्रेष्ठ श्री गोस्वामी तुलसीदासजी महाराज यांच्या ‘श्रीराम चरित मानस’ या मराठी ग्रंथावर आधारित प्रवचनकार कांचनताई धनाले यांचे ‘रामकथा प्रवचन’ झाले. या माध्यमातून प्रभू श्रीरामांचा जीवनपट ओघवत्या शैलीत सौ.धनाले यांनी उलगडला.
या निमित्ताने श्रीराम नाम जप, भजन, भरतनाट्यम,सुंठवडा व प्रसाद वाटप अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.दरम्यान आज दिवसभर श्रीराम नवमीच्या निमित्ताने दर्शनासाठी नागरिकांनी रीघ लावली होती.त्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता.