गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक : हनी ट्रॅपच्या प्रकारांनी कोल्हापूर जिल्हा निघाला ढवळून ; आणखी एका व्यावसायिकाला दीड कोटीला लुटले

कोल्हापूर प्रतिनिधी :

एकापाठोपाठ एक उघडकीस येणार्‍या हनी ट्रॅपच्या प्रकारांनी कोल्हापूर जिल्हा ढवळून काढला आहे. यात आणखी एका 52 वर्षीय व्यावसायिकाच्या हनी ट्रॅपची भर पडली आहे. चौघा सराईत गुन्हेगारांनी व्यावसायिकाला दीड कोटीला लुटल्याची चर्चा आहे. अश्लील चित्रफीत व्हायरलची धमकी देऊन वारंवार खंडणी वसुली सुरू असल्याने व्यावसायिकांसह कुटुंबीयही हैराण झाले आहे.
‘हनी ट्रॅप’मध्ये गुंतवून कापड व्यापार्‍याला लुटल्याची घटना उघडकीला आल्याने आणि पोलिसांनी युवतीसह सात संशयितांना बेड्या ठोकल्याने व्यावसायिकाचे गुन्हेगारी टोळीकडून वर्षभर होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीची घटना बहुचर्चित ठरली आहे. संबंधित व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी धाडसाने पुढे येऊन समाजकंटकाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सोमवारी केले आहे.

युवतीच्या चिथावणीने टोळीकडून ब्लॅकमेलचा प्रकार लॉकडाऊन काळात म्हणजे ऑक्टोबर 2020 मध्ये संबंधित व्यावसायिकावर संघटित टोळीकडून ट्रॅप लावण्यात आला. अनोळखी युवतीने मोबाईलद्वारे चॅटिंग सुरू केले. व्यावसायिकानेही प्रतिसाद दिला. कालांतराने चॅटिंगद्वारे सातत्याने संपर्क येऊ लागला. जवळीकता वाढत गेली. युवतीच्या संपर्कातील चौघा सराईतांनी व्यावसायिकाला गाठून त्यांना ब्लॅकमेल सुरू केले आहे.

दीड कोटीहून जादा खंडणी उकळल्याची चर्चा

अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वर्षभराच्या काळात वेळोवेळी सतत खंडणी वसुली करण्यात येत आहे. या काळात दीड कोटीपेक्षा अधिक रक्कम उकळल्याची चर्चा आहे. एकेकाळी दुचाकीवरून फिरणारे चारही सराईत डोळ्यावर महागडा गॉगल लावून मोठ्या दिमाखात चारचाकी मोटारीतून वावरत आहेत. अल्पावधीत कामधंदा न करता चौघांकडे पैसा आला कोठून, हा चर्चेचा विषय आहे.

सायबर क्राईम यंत्रणांशी तत्काळ संपर्क साधून तक्रारी दाखल करा : शैलेश बलकवडे

हॅनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून उद्योग, व्यावसायिक, व्यापार्‍यांसह कॉलेज तरुणांना ब्लॅकमेल करून तसेच अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसुलीच्या प्रामुख्याने घटना लॉकडाऊन काळात वाढल्या आहेत. फसगत झालेल्यांनी थेट सायबर क्राईम यंत्रणांशी तत्काळ संपर्क साधून तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. हनी ट्रॅपमध्ये संघटित टोळ्यातील गुन्हेगारांचा सहभाग वाढला आहे.

तक्रार दाखल झाल्यास टोळ्यांवर कठोर कारवाई करून पर्दाफाश करण्यात येईल. तक्रारदारांच्या नावाबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे. याबाबत प्रभारी अधिकार्‍यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. कापड व्यापार्‍याला लुटणार्‍या टोळीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. समाजकंटकांनी आणखी व्यापार्‍यांची पिळवणूक केली आहे. याचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks