शिवसेना : ठाकरे आणि शिंदे वाद चांगलाच उफाळणार ; शिंदे गट नवं सेनाभवन दादरमध्येच उभारणार

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
शिंदे आणि ठाकरे वाद आता चांगलाच उफाळून आला असून दोघांच्या चुरशीची लढत सुरू आहे. या लढतीत आता शिंदे गटाने नवा डाव खेळला आहे. ठाकरे गटाला आव्हान देण्यासाठी आता शिंदे गट मुंबईत नवं सेना भवन उभारणार आहे.
दादरमध्येच हे नवं सेना भवन उभारलं जाणार असल्याची माहिती सदा सरवणकर यांनी दिली आहे.सातत्याने शिंदे गट ठाकरेंना दणका देत असल्याचं दिसून येत आहे. याबद्दल शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी माहिती दिली आहे.
आज एक आाभास निर्माण केला जातोय की मुंबईवर ठाकरे गटाचं राज्य आहे. मुंबईतल्या जनतेचं, शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंवर नाराजी आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना कोणतीही कामं झाली नाहीत.
एकाही बेरोजगाराला नोकरी मिळाली नाही. सरवणकर पुढे म्हणाले की, आता लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जातील, शाखाप्रमुखांची घोषणा होईल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम जोरदार सुरू होईल. शिंदे साहेबांच्या कामाची गती पाहता त्यांना चांगल्या कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे दादरमध्येच त्यांचं एक मुख्य कार्यालय असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली इतर शाखा काम करतील.