मुरगुड-कोल्हापूर बस फेरीचे ज्येष्ठाच्या हस्ते नव्या बसचे पूजन करून लोकार्पण

मुरगुड प्रतिनिधी: विजय मोरबाळे
मुरगुड बस स्थानकावर मुरगुड येथील ज्येष्ठ नागरिक बळीराम तातोबा सातवेकर यांच्या हस्ते नव्या बसचे पूजन करून मुरगुड -कोल्हापूर या फेरीचे लोकार्पण करण्यात आले.कोविड महामारी व कर्मचाऱ्यांच्या दीर्घ कालीन संपामुळे एसटीची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली होती. याचा विपरीत परिणाम प्रवासी सेवेवर झाला होता. त्यामुळे पूर्वी सुरू असलेल्या अनेक बसेस बंद करण्यात आल्या होत्या.
मे महिन्यानंतर एसटीची आर्थिक परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर येत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना या अभिनव योजनांच्यामुळे प्रवाशांचा ओढा पुन्हा एसटीकडे वाढला आहे. त्यामुळे मुख्य बस स्थानकातून सुरू असलेल्या पूर्वीच्या प्रवासी प्रतिसाद असलेल्या चांगल्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न प्रत्येक आगारात सुरू आहे. या धर्तीवरच पूर्वी मुरगूड- कोल्हापूर या मार्गावर तब्बल ४ बसेस जलद फेऱ्या सूरू होत्या सध्या दोन नव्या बसेस या मार्गावर पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांना याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास आणखीन बसेस सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले .
यावेळी मुरगुड येथील कुबेर रियल इस्टेट अँड डेव्हलपर्सचे संस्थापक श्री बळीराम तातोबा सातवेकर यांच्या हस्ते नव्या बसचे पूजन करण्यात आले. यावेळी मुरगुड व्यापारी असोसिएशन चे प्रशांत शहा, एसटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.