एआय तंत्रज्ञान वापरात ‘शाहू’चा शेतकरी अग्रभागी असणे हीच दिवंगत राजे साहेबांना श्रद्धांजली-राजे समरजितसिंह घाटगे ; स्व.घाटगे यांच्या जयंतीनिमित्त एआयमध्ये सहभागी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मंजुरी पत्राचे वाटप

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले.ऊशेतीमध्ये खर्चात कपात करून उत्पादनात वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञान क्रांतिकारक ठरल्याचे प्रयोगातून सिद्ध झाले आहे. या तंत्रज्ञानाचा शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.एआय तंत्रज्ञान वापरण्यामध्ये शाहू कारखाना अग्रेसर राहिल इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होणे हीच त्यांना जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली ठरेल. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
शाहू उद्योग समूहाचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७७व्या जयंतीच्या निमित्ताने ऊस पीक मार्गदर्शन व ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा व या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना राजे बेंकेमार्फत देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्ज स्वरूपातील कर्ज मंजुरी पत्राचे वाटप अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते.यावेळी राजे विक्रमसिंह घाटगे बॅंकेमार्फत प्रतिनिधिक स्वरूपात अकरा शेतकऱ्यांना कर्ज मंजुरी पत्राचे वाटप घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.
राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, दिवंगत राजेसाहेब यांनी कारखान्यासह ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान सर्वप्रथम शाहू साखर कारखान्यात वापरण्यास नेहमीच प्राधान्य दिले. संशोधन केंद्रातील अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. याचेच पुढचे पाऊल म्हणून आम्ही एआय तंत्रज्ञान वापरासाठी प्रोत्साहन देत आहोत.हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी कारखान्याकडे आजअखेर शहाऐंशी शेतकऱ्यांनी दोनशे एकरहून अधिक क्षेत्राची नोंदणी केली आहे. अजूनही ज्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी कारखान्याकडे नोंदणी करावी. असे आवाहन घाटगे यांनी केले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,संचालक रमेश माळी, सर्व संचालक -संचालिका, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते. शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी स्वागत केले. ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.