रक्षाबंधनदिनी झाडांना राखी बांधून जपले ऋणानुबंध

गारगोटी प्रतिनिधी :
श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेदिवशी रक्षा बंधनाचा सण देशभरात मोठ्या आनंदात साजरा होतो. बहीण भावाच्या पवित्र नातेबंधाचा हा सण..आजच्या दिवशी बहीण भावाच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते यातून स्नेहभावना, प्रेम, जबाबदारी, जिव्हाळा, मित्रत्व वृद्धिंगत होते शिवाय एकमेकांना ऋणानुबंधनात जोडणारा हा सण इतर कोणत्याही संस्कृतीत पहायला मिळत नाही.
सामाजिक ऐक्याची भावना वाढीस लागण्यासाठी असे सण महत्वाचे आहेतच शिवाय रक्ताच्या नात्यापालिकडे जाऊन, आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास अश्या सणांमुळे वाव मिळतो. अशाप्रकारची एकरूपता, ऐक्य ज्या समाजात, संस्कृतीत असते तो समाज सामर्थ्यशाली बनतो, हाच संदेश राखी पौर्णिमा सणातून मिळतो,.
आजघडीस सर्वच स्तरातुन पर्यावरण जतन व संवर्धनासाठी प्रयत्न होत आहेत. यामध्ये झाडाचं महत्वही अधोरेखित होत आहे. निसर्गाचे आपणही काही देणं लागतोय, पण तेवढी आपली कुवत नाही,.निसर्ग हवं ते निर्माण करण्याबरोबर नष्टही करू शकतो, त्यामुळे निसर्गापुढे आपला बडेजाव अस्तित्व क्षणिक, क्षणभंगुर.. ह्या क्षणिक अस्तित्वाच्या लढाईत आपण निसर्गाचे जमेल तेव्हढ्या प्रयत्नाने ऋण फेडायला हवेत.
आपण निसर्गाचे देणं लागतोय, त्यामुळे निसर्ग, झाडे -वेली विषयी आपल्या कृतीतून कृतज्ञता हि व्यक्त व्हायला हवी. त्याचं जतन, संवर्धन व संगोपन व्हायला हवे, झाडांना संवेदना असतात हे शास्त्राने सिद्ध केलंय. आपल्या हळुवार स्पर्शाने ती आपली होऊन जातात, पण जंगल संस्कृतीतील मानवाचा जबरी प्रवेश त्याच्या मुळावर उठलाय, अश्या परिस्थितीत बहीण भावाच्या पवित्र सणादिवशी वृक्षांना मायेचा ओलावा देऊन वृक्ष बंधू वडास अन इतर झाडांना पर्यावरणमित्र अवधुत पाटील यांच्या कन्या जान्हवी, मिथाली व परिवाराने राखीचा धागा बांधून, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली. अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करताना झाडांप्रति कृतज्ञतापुर्वक ऋणानुबंध जपले.
गारगोटी परिसरात संपन्न झालेल्या ह्या अनोख्या पर्यावरणपूरक उपक्रमात जान्हवी पाटील, मिथाली पाटील, वैष्णवी पाटील, मयुरी पाटील, पर्यावरमित्र अवधुत पाटील, क्षितीज पाटील, शंभूराजे पाटील आदींनी सहभाग घेतला.