सोनाळीतील सात वर्षीय मुलाचे अज्ञाताकडून अपहरण

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनाळी ( ता. कागल ) येथील कु. वरद रविंद्र पाटील या सात वर्षीय मुलाचे अज्ञाताने अपहरण केले आहे .वरद याचे आजोळ सावर्डे बुद्रुक असून, मंगळवारी त्याच्या आजोबांच्या नवीन घराची वास्तुशांती कार्यक्रम असल्याने सावर्डे बुद्रुक येथे कुटूंबियांसह गेला होता.रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर गेला. त्यानंतर उशीरापर्यंत तो घरी परत न आल्याने रात्रभर कुटूंबियांनी त्याचा गावात शोध घेतला. परंतू तो आढळून आला नाही.आज दिवसभर शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याचे वडील रविंद्र पाटील यांनी मुरगूड पोलिसांत अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली आहे.
ही घटना मंगळवारी दि.१७ रोजी मुलाच्या आजोळी सावर्डे बुद्रुक ता.कागल येथे रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली.पोलिसांनी याबाबत अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस व नातेवाईंकाकडून परिसरात मुलाचा शोध घेण्याचे काम बुधवारी दिवसभर सुरु होते.
या मुलाचे वय ७ वर्षे असून रंगाने तो गोरा, अंगाने सडपातळ, उंची साडेतीन फूट, अंगात फूल बाह्याचा दगडी रंगाचा टी शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पँट अशा पेहराव्याचा मुलगा आढळल्यास मुरगूड पोलिस किंवा कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे.